ठाणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईची झळ बसत असून आता शहरी भागातही विविध ठिकाणी पाणी टंचाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात तीव्र उन्हाळ्याचा इशारा दिलेला असतानाचा एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचा पाणीसाठा हा ४६.४५ टक्क्यांवर आला आहे. तर आंध्रा धरणातील पाणीसाठा देखील ५१.३३ टक्क्यांवर आला आहे. यामुळे नागरिकांनी पुढील एप्रिल ते जून या कालावधीत अत्यंत जपून पाणी वापरावे असे आवाहन जिल्हा पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे

मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळा अधिक तीव्र आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये दररोज उन्हाचा पारा हा चढाच पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासूनच सर्वत्र तीव्र उष्णता जाणवत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा वापर ही सर्वत्र अधिक होऊ लागला आहे. तर ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत फेब्रुवारी महिन्यातच आटून गेले असून या ठिकाणी गेल्या अनेक आठवड्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याच बरोबर जिल्ह्यातील शहरी भागांतील अनेक गृहसंकुलांमध्ये ही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे ही समोर आले आहे. यामुळे यंदा सर्वत्र एप्रिल महिन्यातच पाणी टंचाई भासू लागली आहे. तर धरणातील पाणी साठा पाहता अंबरनाथ शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने थेट पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तर उष्णतेचा तडाखा याच पद्धतीने राहील तर वाढत्या पाण्याच्या मागणी पाहता जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये ही पाणी कपात लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही..

जिल्ह्यातील नागरी वसाहती तसेच औद्योगिक वसाहतींना मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणातून आणि पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या आंध्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी बारवी धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता ही ३३८.८४ दशलक्ष लिटर इतकी आहे. तर आंध्रा धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता ३३९.१४ दशलक्ष लिटर इतकी आहे. सद्यस्थितीत बारवी धरणात एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत १५७.३८ दशलक्ष लिटर म्हणजेच ४६.४५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर आंध्रा धरणात सद्यस्थितीत १७४.०९ दशलक्ष लिटर म्हणजेच ५१.३३ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

बारवी धरणातील पाणीसाठा हा संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा असून गेल्या एक आठवड्याच्या कालावधीतच धरणाच्या पाणीसाठ्यात २.१६ टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे येत्या जून महिन्याच्या अखेरपर्यंत हा पाणीसाठा पुरवणे जिल्हा प्रशासनासाठी आव्हान असणार आहे.