तोंडली, तालुका मुरबाड
संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ाचे लक्ष लागून राहिलेल्या बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात धरणाच्या पाणीसाठय़ात वाढ होणार आहे. या विस्तारीकरणामुळे तोंडली व काचकोली गावातील साठ घरे पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने तोंडली ग्रामस्थांनी अद्याप आपल्या घरांचा ताबा सोडलेला नाही. धरणामुळे दोनदा विस्थापित व्हावे लागलेल्या तोंडलीवासीयांनी आता योग्य मोबदला मिळेपर्यंत गाव न सोडण्याचा निर्धार केला आहे..
कोणत्याही लहान मुलांना निसर्गचित्र काढायला सांगितले की त्यात हमखास नदी, डोंगर, त्यालगत असलेली कौलारू घरे येतात. मात्र प्रत्यक्षातले चित्र वेगळेच असते. नदीकिनारी असलेल्या गावकऱ्यांच्या मानेवर कायम विस्थापित होण्याच्या भीतीची टांगती तलवार असते. मुरबाड तालुक्यातील तोंडली याबाबतीत अतिशय दुर्दैवी गाव. कारण या गावाला लगतच्या बारवी नदीवरील धरणासाठी दोनदा विस्थापित व्हावे लागले. आता ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांना वाढीव पाणीपुरवठय़ासाठी अन्य कोणताही पर्याय नसल्याने पुन्हा एकदा बारवीची उंची वाढविण्यात आली असून त्यामुळे तोंडलीवासीयांना आताची जागाही सोडावी लागणार आहे..
बारवी धरणाची उंची वाढल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अधिक पाणीसाठा होऊन तोंडली व काचकोली गावातील साठ घरे पाण्याखाली जाणार आहेत. आणीबाणीच्या काळात कोणतीही बिकट परिस्थिती उद्भवू नये म्हणून एमआयडीसीच्या वतीने संक्रमण शिबीर उभारण्यात आली आहेत. एमआयडीसीचे अधिकारी गावकऱ्यांना योग्य तो मोबदला दिल्याचे सांगत असले तरी गावकरी मात्र अद्याप आमच्या मागण्यांची पूर्तता झाली नसल्याचा दावा करीत आहेत.
बारवी नदीच्या काठी तोंडली गाव वसले आहे. तोंडली गावात जाण्यासाठी प्रथम मुरबाड गाठावे लागते. तेथून एस.टी. बस अथवा सहा आसनी रिक्षातून तोंडली गावात जाता येते. मुरबाड एस.टी. स्थानकापासून साधारण १२ किलोमीटरवर तोंडली गाव आहे. मुरबाड-कर्जत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरूअसल्याने या भागाचा विकास झाल्याचे चित्र लगेच तुमच्या नजरेत बसते. मात्र याच रस्त्याच्या कडेला वसलेल्या तोंडली गावाचा बसथांबा पाहताच येथील बकालपणाची जाणीव होते. मातीचा रस्ता तुडवत मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर चालत गेलो की आपण वरच्या तोंडलीत पोहोचतो. त्यानंतर खालची तोंडली गाव लागते. तोंडली गाव दोन भागांत विभागले गेले आहे- खालची तोंडली आणि वरची तोंडली. वरची तोंडली हे जरा डोंगराच्या उंचवटय़ावर असल्याने त्याला वरची तोंडली म्हणून ओळखले जाते, तर गावातील इतर घरे ही डोंगराच्या पायथ्याशी खोलगट भागात असल्याने त्यांना खालची तोंडली म्हटले जाते. १९७२ मध्ये बारवी धरण बांधण्यासाठी प्रथम या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर १९८८ मध्ये पेंढय़ाला आग लावून भडकलेल्या वणव्यात संपूर्ण गाव बेचिराख झाले होते. तेव्हा दुसऱ्यांदा या गावाचे पुनर्वसन झाले आणि आता विस्थापित होण्याची ही तिसरी वेळ आहे. रामभाऊ बांगर यांनी सुरुवातीला गावाची थोडक्यात हकिकत सांगितली.
खालच्या तोंडली गावात सुमारे दोनेकशे घरे आहेत, तर वरच्या तोंडलीत तीनशेच्या आसपास घरे आहेत. कातकरी, हरिजन, कुणबी, आदिवासी जमातीचे लोक येथे राहतात. शेती हे त्यांच्या उपजीविकेचे साधन असून भात, नांगली, वरी, उडीद यांसह भाज्यांची विविध पिके ते पिकवतात. जवळच असलेल्या मुरबाडच्या बाजारात येथील महिला हे विकण्यासाठी जातात.
गावात जिल्हा परिषदेची दहावीपर्यंत शाळा आहे. गावातील तरुण जेमतेम दहावी, अकरावी शिकलेले आहेत. गावातील तरुण वर्ग हा एमआयडीसीमध्ये मजुरी करण्यासाठी जातो. पुनर्वसनात अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्याने ते भूमिहीन झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मजुरीशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. अत्यंत अल्प दरात त्यांना राबावे लागते. त्यातून एमआयडीसीनेही योग्य मोबदला न दिल्याने ग्रामस्थांची कोंडी झाली आहे. एमआयडीसीविरोधातील या संघर्षांत आमच्या दोन पिढय़ा संपल्या. मुलांना ना नीट शिक्षण देता येत आहे, ना घराचा प्रश्न सुटत. ठाणे जिल्ह्याच्या पाणीपुरवठय़ाचे मुख्य स्रोत असलेले बारवी धरण जवळ असूनही या भागातील एकाही गावासाठी धडपणे पाणी योजना राबविण्यात आलेली नाही. गावाला पंचायतीकडून होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठय़ावर अवलंबून राहावे लागत आहे. बारवी धरण बांधले तेव्हा गावातील विहिरी या गाळाने व पाण्याने बुजून गेल्या. त्यामुळे आता केवळ नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठय़ावरच आम्हाला अवलंबून राहावे लागते, असे रमेश बांगर सांगतात.
घर आणि जागेपोटी मिळालेला मोबदला अतिशय कमी आहे. त्यामुळे २०१४ च्या बाजारभावाप्रमाणे पैसे मिळावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांना पुनर्वसनात गावठाणाची जागाही हवी आहे.
बारवी धरणाच्या सांडव्यांची उंची तीन मीटरने वाढविण्यात आल्याने पाणीसाठय़ात ६० दशलक्ष घनमीटरने वाढ होणार आहे. धरणाचे पाणी वाढले की ते पहिल्यांदा तोंडली गावातील ग्रामस्थ पुंडलिक बांगर यांच्या घरात घुसणार आहे. मृत्यू अक्षरश: त्यांच्या दारी उभा आहे. मात्र घर सोडून जाणार कुठे, असा त्यांचा सवाल आहे. वरच्या तोंडली गावात भाडय़ाने घरे उपलब्ध आहेत, परंतु ते भाडे भरण्याची आमची आर्थिक स्थिती नाही. मजुरी करून पोट भरणारी आम्ही माणसे आहोत, असे ते सांगतात.
तोंडली गावाबरोबरच काचकोली गावातील घरेही पाण्याखाली जाणार आहेत. शिवाय २००७ साली जी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहघरस, कोळेगाव, काचकोली, माणीवली, तळेवाडी ही गावे उंचवटय़ावर असली तरी त्यांच्या चारही बाजूने पाणी साचून या गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर येथील नागरिकांचा बचाव कसा करायचा याचा काही विचार एमआयडीसीने केला आहे का, असा प्रश्न पुंडलिक बांगर व रोहित बांगर यांनी उपस्थित केला आहे.