ठाणे : मुंब्रा रेल्वे पुलालगत मुख्य जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. या कामासाठी गुरुवारी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले. मुंब्रा रेल्वे पुलाजवळ ३५० मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती सुरू आहे.
हेही वाचा >>> कळवा स्थानकाजवळ ओव्हरहेड तार तुटली
या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने शहरातील पाणी पुरवठा गुरुवारी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत रेतीबंदर, दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, मुंब्रादेवी, जीवनबाग, ठाकूरपाडा, आनंद कोळीवाडा, सम्राट नगर, संजय नगर, गावदेवी परिसरात होणारा पाणीपुरवठा बंद राहील. या दुरुस्ती कामामुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असे महापालिकेने स्पष्ट केले.