एकाच दिवशी खंडीत केल्या २४ अनधिकृत नळ जोडण्या

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत नळजोडण्यांविरोधात पाणी पुरवठा विभागाने विशेष मोहिम हाती घेतली असून यामध्ये दिवा-आगासन भागातील २४ अनधिकृत नळजोडण्या बुधवारी दिवसभरात खंडीत करण्यात आल्या. त्याचबरोबर याच परिसरात सुरू असलेले अनधिकृत टँकर भरणा केंद्रावर पालिका प्रशासनाने कारवाई करत ते बंद केले आहे. यापुढे हि कारवाई सुरूच राहणार असल्यामुळे अनधिकृत नळजोडणीधारकांबरोबरत अनधिकृत टँकर भरणा केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. शहराच्या विविध भागात अनधिकृतपणे नळजोडण्या घेऊन पाण्याची चोरी केली जात असून यामुळेच पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाने अनधिकृत नळजोडण्यांविरोधात विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहीमेत बुधवारी दिवा-आगासन भागातील २४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात आली. शहरांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने टँकरने पाणी विकत घेण्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

परंतु काही ठिकाणी अनधिकृतपणे टँकर भरणा केंद्र सुरू असल्याच्या तक्रारीही पुढे येत असतानाच, ठाणे महापालिकेने बुधवारी दिवा-आगासन भागात सुरू असलेल्या अनधिकृत टॅँकर भरणा केंद्रावर कारवाई केली. यामध्ये पंपांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच, अनधिकृत टँकर भरणा केंद्र बंद करण्यात आले आहे.

ही कारवाई परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विनोद पवार, कार्यकारी अभियंता शशिकांत साळुंके, प्रशांत फिरके यांच्या उपस्थितीत मुंब्रा-दिवा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणेही कारवाई केली. अनधिकृत टँकर भरणा केंद्रप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात येत असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.