पूर्व भागातील रहिवाशांना चिखलोली धरणातून पाणीपुरवठा

अंबरनाथ : चिखलोली धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामामुळे अंबरनाथ पूर्वेतील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून एक दिवसाआड पाणी मिळत आहे. मात्र हे धरण पूर्णपणे भरले असल्याने फेब्रुवारीपर्यंत रिकामे करण्याची गरज असल्याने पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाणीपुरवठा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे रविवारपासून काही प्रमाणात धरणातून अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली.

अंबरनाथ शहराच्या विविध भागात विविध माध्यमांतून पाणीपुरवठा केला जातो. बदलापूर शहरातील उल्हास नदीवरील बॅरेज बंधाऱ्यातून साधारणत: ५० दशलक्ष लिटर पाणी अंबरनाथला दिले जाते, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १० आणि चिखलोली धरणातून सहा दशलक्ष लिटर पाणी अंबरनाथला मिळते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून अंबरनाथ शहरातील चिखलोली धरणाचे उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी धरण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रिते केले जाते. त्याचा परिणाम थेट अंबरनाथ पूर्वेतील पाणीपुरवठ्यावर होतो. त्याला पर्याय म्हणून एमआयडीसी प्रशासनाकडून मिळालेले पाणी अंबरनाथ पूर्व भागात दिले जाते आहे. मात्र हे पाणी एक दिवसाआड दिले जात असल्याने नागरिकांना दररोज टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे चिखलोली धरणातून पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे.

जुलै महिन्यात चिखलोली धरण आपल्या पूर्ण क्षमतेने भरले. मात्र पाण्याच्या चाचण्या आणि दर्जा यामुळे पाण्याचा पुरवठा केला जात नव्हता. अखेर चिखलोली धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाने परवानगी दिल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात कमी क्षमतेने पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. येत्या आठवडाभरात पूर्ण क्षमतेने पाण्याचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे अंबरनाथ पूर्वेतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

पाणीपुरवठा फक्त फेब्रुवारीपर्यंतच

चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असले तरी अजूनही बरेच काम शिल्लक आहे. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यापर्यंत धरण रिकामे करावे लागणार आहे, अशी माहिती लघू पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यानी दिली आहे. त्यामुळे अंबरनाथकरांना चिखलोली धरणाचे पाणी फक्त फेब्रुवारीपर्यंत मिळणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारीनंतर पुन्हा अंबरनाथकरांना पाणीटंचाई सहन करावी लागणार हे निश्चित आहे.  तसेच धरणातून गेल्या काही वर्षात गढूळ पाणी दिले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे शुद्ध पाणी देण्याचे आव्हान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासमोर आहे.

Story img Loader