ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये नविन पंपिग मशिनरी बसवण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात जलमापक बसवण्याचंही काम सुरू आहे. या कामासाठी बुधवारी (११ मे) सकाळी ९ वाजल्यापासून ते गुरुवार सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दरम्यानच्या २४ तासांच्या कालावधीत ठाणेकरांची पाण्यासाठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
संबंधित कामांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवणं आवश्यक आहे. दिलासादायक बाब म्हणजे या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. आपल्या स्वतःच्या योजनेचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने स्टेम प्राधिकरणाचं पाणी झोनिंग पद्धतीनं ठाणे शहरात वितरीत केलं जाणार आहे.
बुधवारी (११ मे) सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, सिद्धेश्वर जॉन्सन, इंटरनिटी, ब्रम्हांड, विजयनगरी गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर बुधवारी रात्री ९ से गुरुवार सकाळी ९ वाजेदरम्यान ऋतू पार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
पाणी पुरवठा व्यवस्था पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवस पुरेल इतक्या पाण्याचा साठा करून ठेवावा, तसेच पाणी जपून वापरावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे.