डोंबिवली- डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पुरेसा पाणी साठा करुन ठेवावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी केले आहे.
हेही वाचा >>> ठाण्यातील दडपशाहीविरोधात ठाकरे गटाचा इशारा
डोंबिवली शहराला उल्हास नदीवरील मोहिली येथील १५० दशलक्ष लीटर उचंदन केंद्रातून पाणी उचलून ते पत्रीपुला जवळील नेतिवली टेकडीवरील जलशुध्दीकरण केंद्रात आणून तेथून ते प्रक्रिया करुन डोंबिवली पूर्व, पश्चिम शहराला पुरवठा केले जाते. डोंबिवली पश्चिमेला गणेश मंदिरा जवळून मुख्य जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या तीन महिन्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोहिली येथील उदंचन केंद्र, नेतिवली टेकडीवरील जलशुध्दीकरण केंद्रात देखभालीची कामे असल्याने याठिकाणी यांत्रिक, तांत्रिक आणि विद्युत दुरुस्तीची कामे पाणी पुरवठा विभागाला हाती घ्यायची आहेत. दिवाळीचा सण तोंडावर आहे. या कालावधीत पाणी पुरवठ्या मध्ये पाणी पुरवठ्यात कोणताही व्यत्य नको म्हणून ही दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत, असे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?
ही दुरुस्तीची कामे मंगळवारी सकाळी आठ वाजता हाती घेऊन रात्री आठ वाजेपर्यंत संपविण्यात येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी शहराला सकाळी, दुपारी, संध्याकाळी होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी एक दिवसाचा पुरेसा पाणी साठा करुन ठेवावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता वाघमारे यांनी केले आहे.