ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील टंचाईग्रस्त परिसर तसेच गृह संकुलांमध्ये प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून रंगपंचमीच्या दिवशी शहरात टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरात टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याचा रंगपंचमीच्या दिवशी अपव्यय होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाखांच्या पुढे गेली आहे. शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराकत दररोज ५८५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी शहरातील विविध परिसर तसेच गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होताना दिसून येते. नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो. या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहीली आहेत. आजही याठिकाणी गृहसंकुले उभारणीची कामे सुरू आहेत. वाढत्या नागरिकरणाबरोबरच येथील नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. त्यात प्रामुख्याने पाणी आणि वाहतूक कोंडीची समस्येचा समावेश आहे. याचबरोबर जुन्या ठाणे, कळवा, मुंब्रा या काही भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होते.
ठाणे महापालिकेच्या मालकीचे तीन टँकर आहेत. याशिवाय, पालिका पाच खासगी टँकर भाडेपट्ट्यावर घेते. अशा एकूण आठ टँकरद्वारे ठाणे महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग शहरातील टंचाईग्रस्त परिसर आणि गृहसंकुलांना मागणीनुसार विनामुल्य पाणी पुरवठा करतो. साकेत येथील पाणी केंद्रावरून पाणी उचलून त्याचा शहरात या टँकरद्वारे पुरवठा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी पालिककेडे टँकरद्वारे पाण्याची मागणी केली जाते आणि त्या पाण्याचा वापर रंगपंचमी खेळण्यासाठी केला जातो, अशी बाब यापुर्वी ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ठाणे महापालिका रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद ठेवते. यंदाही ठाणे महापालिकेने हा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे ठाण्यात रंगपंचमीच्या दिवशी टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यास बंदी असणार आहे.
कोटठाणे महापालिकेकडून टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याचे रंगपंचमीच्या दिवशी अपव्यय होण्याची शक्यता असते. हा अपव्यय टाळण्यासाठी यंदाही शहरात टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. – विनोद पवार, उपनगर अभियंता, ठाणे महापालिका