ठाणे : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न वसुलीचे दिलेले उद्दीष्ट गाठण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून बुधवारी दिवसभरात पाणी पुरवठा विभागाने १२९ थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडून पाणी पुरवठा खंडीत केला आहे. तसेच दिवसभरात दोन कोटी रुपयांहून अधिक देयकांची वसुली केली आहे.
ठाणे महापालिकेच्या २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पात पाणी पुरवठा विभागाला २२५ कोटी रुपयांच्या उत्पन्न वसुलीचे उद्दीष्ट आखून देण्यात आले होते. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासुन प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत १३६ कोटी रुपयांची वसुली करण्यात पाणी पुरवठा विभागाला यश आले आहे. ही वसुली गेल्यावर्षीच्या याच काळातील वसुलीपेक्षा १३ कोटी रुपयांनी अधिक असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. असे असले तरी काही पाणी देयक थकबाकीदार मात्र थकीत रक्कम भरण्यास तयार नसल्याचे चित्र असून अशाच थकबाकीदारांविरोधात पाणी पुरवठा विभागाने गेल्या वर्षभरापासून कारवाई सुरू केली आहे. यामध्ये वर्षभरात पाणी पुरवठा विभागाने एकूण १२७९० जोडण्या खंडित केल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विविध विभागांच्या महसुलाच्या वसुलीचा आढावा घेतला होता. तसेच, मार्च अखेरपर्यंतचा काही दिवसांचा उपलब्ध कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश दिले होते. यानुसार पालिकेने पाणी देयकांच्या वसुलीचा वेग वाढविला असून त्याचबरोबर थकबाकीदारांविरोधातील कारवाई जोरात सुरू केली आहे. यामध्ये बुधवारी दिवसभरात पाणी पुरवठा विभागाने १२९ थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडून पाणी पुरवठा खंडीत केला आहे. तसेच दिवसभरात दोन कोटी रुपयांहून अधिक देयकांची वसुली केली आहे.
वर्षभरात कारवाई
आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच मार्च महिनाअखेरपर्यंत जास्तीत जास्त पाणी देयक वसुली करण्यात येणार आहे. मोठे गृहसंकुल, टाॅवर, व्यावसायिक ग्राहक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात पाणी पुरवठा विभागाने एकूण १२७९० जोडण्या खंडित केल्या आहेत. वर्षभरात आतापर्यंत, १३४०२ जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. २३६१ मोटर पंप जप्त करण्यात आले असून ६७६ पंप रुम सील करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.
अभय योजना नाही मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी देयकांची रक्कम भरणा करणार नाहीत, अशा ग्राहकांचा पाणी पुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार आहे. तसेच, थकबाकीवरील प्रशासकीय आकार, दंड, व्याज यांच्यावर लागू असलेली १०० टक्के माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नाही. या अभय योजनेची मुदत ३१ मार्च, २०२५ पर्यंतच राहणार आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.