ठाणे : मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबविण्यासाठी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी ८ तासाकरीता दिवा शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत निळजे येथून दिवा येथील प्रभाग क्रमांक २७ आणि २८ करीता ५०० मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. या जलवाहिनीवर उसरघर रेल्वे कल्व्हर्ट पलावा सिटी कंपाऊन्ड येथे मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे. या गळतीमुळे या परिसरात वारंवार कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिनीवर झालेली गळती थांबविणे अत्यावश्यक असल्यामुळे पालिकेमार्फत हे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ८ तासाकरीता दिवा शहरातील प्रभाग क्रमांक २७ आणि २८ मध्ये होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. ही गळती थांबल्यावर दिवा प्रभाग समिती अंतर्गत आगासन, बेतेवडे, गणेश नगर, बेडेकर नगर, म्हसोबा नगर, शांती नगर, मुंब्रा देवी कॉलनी, साबे गाव व दिवा पश्चिम या परिसरातील पाण्यासंबधीत तक्रारी कमी होतील, असा दावा पालिकेने केला आहे.