लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या उल्हास नदीवरील मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या कच्चे (अशुध्द) आणि शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसविण्याचे काम मंगळवारी (ता. २२) करण्यात येणार आहे. या कामासाठी नऊ तासाचा कालावधी लागणार असल्याने या जलवाहिन्यांवरून पाणी पुरवठा होणाऱ्या कल्याण, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत बंद राहणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुडे यांनी दिली.
मोहिली येथील शुध्द आणि अशुध्द पाण्याच्या मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर (फ्लो मीटर) बसविण्याच्या काळात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने या कालावधीत मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या कल्याण ग्रामीण विभाग, मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, अटाळी, शहाड आणि परिसरातील गावे. तसेच कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग हद्दीतील मिलिंदनगर, योगीधाम, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा वसाहत, मुरबाड रस्ता परिसर आणि चिकनघर भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
मंगळवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
प्रवाह मीटर
कल्याण डोंबिवली पालिकेच्या उल्हास नदी काठच्या उदंचन केंद्र आणि जलशुध्दीकरण केंद्र येथील मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर (फ्लो मीटर) यापूर्वीच बसविण्यात आले आहेत. काही मीटर जुने झाले आहेत. काहींमध्ये तांत्रिक बिघाड होतात. त्यामुळे ते वेळीच बदलण्याचे काम करावे लागते, असे पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती नियंत्रणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सांगितले.
उल्हास नदीतून १४० एमएलडी अशुध्द पाणी उचलून ते जलशुध्दीकरण केंद्रात पाठविले तर जलशुध्दीकरण केंद्रातून हे पाणी शहराला पाणी पुरवठा करताना १४० एमएलडी आहे ना याचा ताळमेळ प्रवाह मोजणी मीटरमधून स्पष्ट होतो. दररोज नदीतून उचलणाऱ्या कच्चा आणि शुध्द पाण्याची मोजणी या प्रवाही मोजणी मीटरमधुन केली जाते, असे ठेकेदाराने सांगितले. उचललेले कच्चे पाणी जलशुध्दीकरण केंद्रातून पुरवठा करणारे शुध्द पाणी यांच्यात काही तफावत आढळून आली तर मात्र प्रवाह मोजणी मीटरमध्ये काही बिघाड आहे का, मुख्य जलवाहिनीवरून कोठे पाणी चोरी होते का, हे प्रकार तपासावे लागतात. यासाठी प्रवाह मोजणी मीटर खूप महत्वाची भूमिका बजावतात, असे ठेकेदाराने सांगितले.
कल्याण पूर्वेत पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या गोविंदवाडी वळण रस्त्यावरून गेल्या आहेत. या रस्त्यावर तबेल्यांच्या ठिकाणी मुख्य जलवाहिनीला नेहमीच छिद्र पाडून तबेले चालक पाणी चोरून वापरतात. गेल्या महिन्यात या भागातील ४१ चोरीच्या नळ जोडण्या शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या उपस्थितीत तोडण्यात आल्या आहेत. या चोरीमुळे कल्याण पूर्वेत नेहमीच कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत.