कल्याण पूर्व, पश्चिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत, यांत्रिक उपकरणांच्या देखभाल, दुरुस्तीची कामे करवायची आहेत. या कामांसाठी शुक्रवारी (ता.५) कल्याण पूर्व, पश्चिम भागाला बारावे जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा सकाळी आठ ते रात्रो आठ वेळेत कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कल्याण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली.
शुक्रवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी एक दिवस पुरेल इतके पाणी साठवून ठेवावे. दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जलशुध्दीकरण केंद्रातील यांत्रिक काही उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. पाणी पुरवठ्यात व्यत्यय नको म्हणून तातडीने हे काम पाणी पुरवठा विभागाकडून हाती घेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.