कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिली, बारावे, नेतिवली, टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांच्या विद्युत, यांत्रिकी देखभाल दुरुस्तीचे काम मंगळवार, ता. ३० जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. या कामासाठी कल्याण, डोंबिवली, ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत बंद राहणार आहे.
कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम, टिटवाळा, वडवली भागाचा पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागाला पाणीपुरवठा केला जातो. मंगळवारी दुरुस्तीच्या कालावधीत पाणीपुरवठा बंंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा – ठाणे : बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला
हेही वाचा – ठाणे लोकसभेसाठी मुख्यमंत्री आग्रही?
कल्याण डोंबिवली शहरांना दररोज सुमारे ३५० हून अधिक दशलक्ष लीटर पाणीपुरवठा विविध स्रोतांमधून केला जातो. डोंबिवली शहराला नेतिवली टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. टिटवाळा, कल्याण पूर्व, पश्चिम भागासाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या स्रोतांमधून मोहने, आंबिवली, वडवली परिसराला पाणीपुरवठा केला जातो. या सर्व विस्तारीत भागाचा पाणीपुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. एमआयडीसी भागाला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या बंदचा एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही.