लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी (ता.१५) सकाळी १० ते संध्याकाळी सहा या वेळेत देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या यांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने दिली.

कल्याण, डोंबिवली शहरांना उल्हास नदी काठच्या मोहिली, नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. या दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत, यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम मंगळवारी (ता. १५) पालिकेच्या नियंत्रणाखाली ठेकेदाराकडून केले जाणार आहे. या दुरुस्तीच्या कालावधीत कल्याण शहरासह, कल्याण ग्रामीण भागातील मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण पश्चिमेतील ब प्रभागातील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, मुरबाड रस्ता परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. डोंबिवली पूर्व, पश्चिमेचा पाणी पुरवठा या कालवधीत बंद राहणार आहे.

आणखी वाचा-ठाणे : चोरीचा संशय घेतल्याने नातवाकडून आजीची वरवंट्याने ठेचून हत्या

या दुरुस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी कल्याण, कल्याण ग्रामीण, डोंबिवली शहरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.