कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रात महावितरणकडून मंगळवारी ((ता.१) रोहित्र दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या दुरुस्तीच्या कालावधीत मंगळवारी सकाळी १० ते दुपारी चार वेळेत कल्याण पूर्व, पश्चिम शहरांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, असे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी सांगितले.

बारावे जलशुध्दीकरण केंद्राला उल्हास नदीतून पाणी पुरवठा केला जातो. बारावे जलशुध्दीकरण केंद्राला महावितरणच्या बारावे येथील वीज पुरवठा केंद्रातून वीज पुरवली जाते. या वीज केंद्रातील क्रमांक चार व चौदा क्रमांकांच्या रोहित्राची देखभाल आणि दुरुस्तीचे काम महावितरणच्या अभियंत्यांकडून केले जाणार आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी सकाळी १० ते दुपारी चार असा सहा तास या केंद्राला होणारा पाणी पुरवठा पालिकेकडून बंद ठेवण्यात येणार आहे.

हे ही वाचा…डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या वाढल्याने नागरिक हैराण

मंगळवारी कल्याण शहराला पाणी पुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी अगोदरच एक दिवस पुरेल इतका पुरेसा साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.