ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी गुरुत्व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम येत्या शुक्रवार आणि शनिवारी करण्यात येणार आहे. त्यासाठी बारवी धरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या शहरांचा शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं आणि दोन दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
ठाणे जिल्ह्यासह नवी मुंबई, मिरा भाईंदर, कल्याण–डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायती आणि विविध औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि जुन्या जलवाहिन्या बदलण्याच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद करण्याची परवानगी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मागितली जात होती. मात्र उन्हाचा वाढलेला पारा, सण आणि उत्सवांमुळे याला परवानगी दिली जात नव्हती.
अखेर या दुरुस्ती कामासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी (६ मे) दुपारी १२ वाजल्यापासून शनिवारी (७ मे) दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी जांभूळ येथील जल केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र् औद्योगिक विकास महामंडळाच्या उपअभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि जुन्या जलवाहिन्यांमध्ये पाच ठिकाणी जोडणीची कामं केली जाणार आहेत. दरम्यान २४ तासांसाठीठाणे जिल्ह्याचा पाणी पुरवठा बंद असेल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापरावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
दुरुस्ती कामाला उन्हाच्या झळा
पाणी पुरवठा बंद केल्यानंतर काही तास जलवाहिन्या रिकाम्या होण्यासाठी लागतात. पहाटेच्या सुमारास हे काम सुरू केल्यास दुपारी दुरुस्तीचं काम करावं लागतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वाढलेलं तापमान पाहता भर उन्हात जलवाहिन्या जोडणीचं काम करणं अशक्य होईल. त्यामुळे हे काम दोन दिवसांत विभागलं आहे. रात्रीच्या वेळीही हे काम सुरू राहणार असल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.