अंबरनाथः बारवी धरणातून गुरूत्वाकर्षणाने उल्हास नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर अंबरनाथजवळी जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. या केंद्रातील गुरूत्ववाहिनीवर तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणाऱ आहे. परिणामी येथून पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या शहरांना पाणी पुरवठा केला जाणार नाही. अंबरनाथ, उल्हासनगरसह अन्य महापालिका, औद्योगिक वसाहती आणि ग्रामपंचायतींना याचा फटका बसणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून जिल्ह्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका, औद्योगिक वसाहती आणि ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा केला जातो. बारवी धरणातून सोडले जाणारे पाणी बारवी नदीमार्गे उल्हास नदीला येऊन मिळते. येथे आपटी बंधाऱ्याजवळून हे पाणी उचलून जांभूळ येथील केंद्रात प्रक्रियेसाठी नेले जाते. तेथे प्रक्रिया करून मोठ्या जलवाहिन्यांच्या माध्यमातून हे पाणी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर महापालिका, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे वागळे इस्टेट, टीटीसी अशा विविध औद्योगिक वसाहतींना पुरवले जाते. त्यामुळे ज्या ज्या वेळी येथील पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यात्या वेळी या सर्व पाणी ग्राहकांना पाणी मिळत नाही. आता याच जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील बारवी गुरुत्ववाहिनीवर तातडीचे देखभाल दुरूस्तीचे काम केले जाते आहे. गुरूवारी रात्रीपासून हे दुरूस्तीचे काम केले जाणार आहे.
हेही वाचा >>>ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार “मालमत्ता पत्रक “
शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत हे दुरूस्तीचे काम सुरू राहील. त्यामुळे एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे अंबरनाथ, अति. अंबरनाथ, बदलापूर औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, परिसरातील इतर ग्रामपंचायती आणि इतर नागरी वस्त्या यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकेंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद असेल. तर पुढील काही तासांकरिता पाणी पुरवठा कमी दाबाने सुरु राहील, अशी माहिती एमआयडीसीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते आहे.