ठाणे : ऑगस्ट महिन्यापासून पावसाळ्याचा जोर कमी होईपर्यंत ठाणे शहरात तात्पुरत्या स्वरूपात विभागवार पद्धतीने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पंधरा दिवसातून एकदा एकेका विभागाचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे राहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई- नाशिक महामार्गाची पाहाणी

ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या व गाळ वाहून येत असल्याने पुरेशा पाण्याचा उपसा करणे शक्य होत नाही. त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित होणे आणि विद्युत जनित्रात तांत्रिक बिघाड होणे असे प्रकार घडत आहेत. त्याचाही पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. यामुळे ठाणे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात. त्यापैकी भातसा नदीच्या पिसे येथील पात्रातून ठाणे महापालिका स्वतःच्या योजनेसाठी पाणी उचलतात.

हेही वाचा >>> भाजप म्हणजे भ्रष्ट जनता पक्ष! ठाण्यातील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचा घणाघात

अतिवृष्टीमुळे पिसे येथील नदी पत्रात मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या आणि गाळ वाहून येत आहे. हा कचरा पाणी उपसा करणाऱ्या पंपाच्या मुखाशी अडकत असल्याने पालिकेला पुरेशा पाण्याचा उपसा करणे शक्य होत नाही. त्यातच पिसे आणि टेमघर येथील वीज पुरवठा खंडित होणे, विद्युत जनित्रात तांत्रिक बिघाड होणे या घटनांमुळे शहरास आवश्यक तेवढा पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मंगळवार, १ ऑगस्टपासून पावसाळ्याचा जोर कमी होईपर्यंत शहरात तात्पुरत्या स्वरूपात विभागवार पद्धतीने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून त्यानुसार, पंधरा दिवसातून एकदा एकेका विभागाचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.  या काळात आवश्यक तो पाण्याचा साठा करून ठेवाव आणि  पाणी काटकसरीने तसेच, गाळून व उकळूनच वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

 विभागवार पाणी बंदचे वेळापत्रक

• सोमवार, ब्रम्हांड, बाळकुम, सकाळी ९ ते रात्री ९

• मंगळवार, घोडबंदर रोड, दुपारी १ ते सायंकाळी ५

• बुधवार, गांधीनगर, सकाळी ९ ते रात्री ९

• गुरूवार, उन्नती, सुरकरपाडा, सिद्धाचल, सकाळी ९ ते रात्री ९

• शुक्रवार, मुंब्रा–रेतीबंदर, सकाळी ९ ते रात्री ९

• शनिवार, समता नगर, सकाळी ९ ते रात्री ९

• रविवार, दोस्ती आकृती, सकाळी ९ ते रात्री ९

• सोमवार, जेल, सकाळी ९ ते रात्री ९

• मंगळवार, जॉन्सन-इटरनिटी, सकाळी ९ ते रात्री ९

• बुधवार, साकेत-रुस्तमजी, सकाळी ९ ते रात्री ९

• गुरूवार, सिद्धेश्वर, सकाळी ९ ते रात्री ९

• शुक्रवार, कळवा-खारेगाव-आतकोणेश्वर नगर, सकाळी ९ ते रात्री ९

• शनिवार, इंदिरा नगर, सकाळी ९ ते रात्री ९

• रविवार, ऋतूपार्क, सकाळी ९ ते रात्री ९