ठाणे : राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) विषाणूंचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेने खबरदारीचा उपाय म्हणून गावांमध्ये होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे नमुने तपासण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ठाणे ग्रामीणमधील ५ हजार ४३० जल स्त्रोतांतील पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे. गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवका घरांमध्ये येणाऱ्या पाण्याचे नमुने गोळा करून त्याची ग्रामपंचायत स्तरावर जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे तपासणी करीत असून अशी तपासणी महिन्यातून एकदा केली जाणार आहे.

जीबीएस विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शुद्ध पाणी पुरवठा होण्याकरिता गाव पातळीवर नळ पाणीपुरवठा योजनांच्या स्रोताद्वारे शाळा, अंगणवाडी आणि नळाद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारे पाणी यांची जैविक तपासणी केली जाणार आहे. यासाठी पाण्याचे नमुने गोळा करून जवळच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा केले जात आहे. तिथे या पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील घरगुती आणि सार्वजनिक स्रोत २ हजार ३६५, ग्रामपंचायत कार्यालय ४३१, शाळा १ हजार २६९, अंगणवाडी केंद्र १ हजार १५२, आरोग्य केंद्र ३३, उपकेंद्र १८० असे एकूण ५ हजार ४३० जल स्त्रोतांची तपासणी करण्यात येत आहे. जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत पाण्याचे निर्जंतुकीकरणही केले जाणार आहे.

ठाणे ग्रामीण भागात घरगुती नळ जोडणीद्वारे प्रति व्यक्तीला किमान ५५ लिटर गुणवत्तापूर्वक शुद्ध पाणी प्रतिदिन पुरवठा करणे आवश्यक आहे. त्यानुसार, जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला घरगुती आणि सार्वजनिक स्रोत, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कामकाज सुरू करण्यात आले आहे.

ग्रामीण जनतेला गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पाणी गुणवत्ता सह नियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम ग्रामीण भागात गावागावात राबविण्यात यावा. याद्वारे गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची आणि घरगुती नळ कनेक्शन द्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची (किमान दोन नमुने) रासायनिक तपासणी वर्षातून एकदा आणि जैविक तपासणी वर्षातून दोनदा प्रयोगशाळेत जमा करण्यात यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व प्रकल्प संचालक जलजीवन मिशन प्रमोद काळे यांनी केले आहे.

Story img Loader