दुकांनामध्ये पाण्याचा चोरून वापर; तक्रारीकडे पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर चौक येथील मटण विक्री दुकानांमध्ये चोरून पाणी वापरण्यात येत आहे. सर्वत्र पाणी टंचाईचे संकट असताना मटण विक्री दुकानदार मात्र महापालिकेच्या जलवाहिन्यांमधून चोरून पाणी वापरत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका जाणकार नागरिकाने याप्रकरणी पालिकेत तक्रार केली आहे.
डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर चौकात मटण विक्रेत्यांची चार ते पाच दुकाने आहेत. मटण विक्रेत्यांना दुकानात स्वच्छता ठेवण्यासाठी सतत पाणी लागते. पाणी साठवून ठेवण्यासाठी दुकानांमध्ये पिंप ठेवण्यात येत नाहीत. त्यामुळे सतत वाहते पाणी दुकानात उपलब्ध व्हावे म्हणून येथील दुकानदारांनी पालिकेच्या रस्त्यालगतच्या जलवाहिनीला छिद्र पाडून त्यामधून थेट जलवाहिनी घेतली आहे. ही जलवाहिनी दुकानाच्या पाठीमागील भागातून आडोसा घेत दुकानात घेण्यात आली आहे.
मुख्य जलवाहिनीवरून ही पाणी चोरी करण्यात येत आहे. या पाणी चोरीमुळे रेतीबंदरमधील काही भागाला नेहमीच पाण्याची टंचाई असते. चाळींच्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो. या पाणी चोरीविषयी आवाज उठविला तर मटण विक्री दुकानदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे स्थानिक रहिवासी या पाणी चोरीविषयी काहीही बोलत नाहीत. या पाणी चोरीविषयी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे या भागातील काही रहिवाशांनी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची कोणीही दखल घेत नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण घटले आहे. धरणांमध्ये पाणी साठा कमी आहे. सर्वत्र चाळीस टक्के पाणी कपात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर मटण विक्रेते चोरून पाणी घेऊन शेकडो लिटर पाणी दररोज दुकानांत स्वच्छता करण्यासाठी वापरत असतील तर पाण्याची ही उधळपट्टी थांबविणे आवश्यक आहे, असे तक्रारदाराने स्पष्ट केले. प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत यांच्याशी संपर्क करूनही तो होऊ शकला नाही.
मटण विक्रेत्यांकडून पाणीचोरी
डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर चौक येथील मटण विक्री दुकानांमध्ये चोरून पाणी वापरण्यात येत आहे.
Written by दीपक मराठे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-09-2015 at 02:24 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water theft from meat sellers