डोंबिवली- येथील पश्चिम भागातील उमेशनगर भागातील रेतीबंदर चौकातील अतिथी हॉटेलच्या बाजुला मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून परिसरातील रहिवासी चोरुन पाणी वापरत आहेत. सकाळच्या वेळेत पालिकेने पाणी सोडले की या जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी फुकट जाते, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
हेही वाचा >>> ठाणे शहराचे तापमान सलग तिसऱ्या दिवशी चाळीशी पार
यापूर्वी या भागातील जलजोडण्या रेल्वे रुळाखालून वेताळनगर भागात नेण्यात आल्या होत्या. आता समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठी रेतीबंदर, देवीचापाडा भागातील रेल्वेरुळा लगतच्या चाळी, झोपड्या तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या भागातील पाण्याच्या काही जोडण्या आहे त्या स्थितीत आहेत. काही पालिकेने बंद केल्या आहेत.
राहिलेल्या काही जलजोडण्यामधून परिसरातील रहिवासी रात्रीच्या वेळेत चोरुन पाणी भरतात. त्या जलजोडणीला प्लास्टिक किंवा लाकडाची पाचर मारुन ठेवतात. सकाळच्या वेळेत पालिकेचे अति दाबाचे पाणी आले की त्या जलजोडण्यांमधून ते परिसरात वाहते. अनेक भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसताना रेतीबंदर चौकात पाणी फुकट जात असल्याने पालिकेने हे फुकट जाणारे पाणी तातडीने रोखावे. या भागातील पाणी चोरीचा रात्रीचा प्रकार बंद करावा, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. पालिकेच्या अभियंत्याने तातडीने या भागाची पाहणी करुन संबंधित जोडणी बंद केली जाईल, असे सांगितले.