पावसाळा म्हटले की चिंब भटकंती. वर्षांऋतूची चाहूल लागताच भटक्यांचे पाय शिवशिवायला लागतात. ठाणे जिल्हय़ातील डोंगरदऱ्यात हिंडायचे आणि धबधब्याखाली किंवा एखाद्या बंधाऱ्याखाली मनसोक्त भिजायचे हा कार्यक्रम पावसाळय़ात भटक्यांकडून आखला जातो. पावसाळय़ात मनसोक्त हिंडायला मिळणार या आशेवरच उन्हाळा सहन केला जातो.. पण आता चिंब भिजण्यासाठी पावसाळय़ाचीच वाट पाहण्याची गरज नाही, कारण वासिंदमध्ये भातसा नदीकाठी एक असा बंधारा आहे, जो आपल्याला बारा महिने धबधब्याची अनुभूती देतो.
वासिंद स्थानकापासून साधारण १० मिनिटांच्या अंतरावर रायकर पाडा आहे. रायकर पाडय़ाच्या एका बाजूला भातसा नदी वाहते. रायकर पाडय़ातून नदीच्या दिशेने जाताना खळखळ आवाज कानावर पडतो आणि आपण बंधाऱ्याजवळ असल्याची जाणीव होते. बंधाऱ्याजवळ पोहोचल्यावर एक अत्यंत निसर्गसौंदर्य दृश्य नजरेस पडते आणि तोंडातून आपसूक ‘वाह!’ असे शब्द बाहेर पडतात. भातसा नदीवर बांधण्यात आलेला हा बंधारा अतिशय विलक्षण आहे. इंग्रजीतील ‘झेड’ (९) अक्षराप्रमाणे आकार असलेल्या या बंधाऱ्याचे चित्र डोळय़ातून साठवून घ्यावेसे वाटते. बंधाऱ्याच्या एका बाजूला पाणी साठले आहे, तर दुसऱ्या बाजूला पाणी दगडातून वाहत खाली जात आहे. दगडातून वाहणारे हे पाणी खळखळ आवाज करत खाली वाहते, तेव्हा या पाण्यात मनसोक्त भिजावे असे वाटते. वर सूर्य आग ओकत असतो, जमीनही तापलेली असते, पण या बंधाऱ्याच्या पाण्यात पाय मोकळे सोडून बसले, की एक थंडगार अनुभव मिळतो. पाणी अतिशय दुधाळ आणि नितळ. त्यात थंडाव्याचा अनुभव मिळत असल्याने मन एकदम प्रसन्न होते.
बंधाऱ्यावरून झेड मार्गाने चालत जात आपल्याला दुसऱ्या तीरावरही जाता येते. बंधाऱ्याची रुंदी साधारण तीन ते चार फूट आहे. बंधाऱ्यावरून चालताना एका बाजूला साठलेले नितळ जल आणि दुसऱ्या बाजूला खळाळत वाहणारे दुधाळ नीर पाहून एक विलक्षण अनुभूती मिळते. अनेक पर्यटक या बंधाऱ्याच्या मध्ये उभे राहून ही अनुभूती घेतात. समोर असलेल्या पुलाच्या दिशेने खळाळत वाहणारी भातसा नदी अतिशय मनमोहक दिसते. भातसा नदीच्या दुसऱ्या तीरावर जंगल आहे. शिशिर ऋतूमुळे जंगलातील झाडे पर्णहीन आणि भकास वाटत होती, पण मधूनच वाहणाऱ्या भातसा नदीमुळे आणि या मनमोहक बंधाऱ्यामुळे या परिसराला जिवंतपणा आला होता. अनेक पर्यटक वासिंदहून मुरबाडला जाणाऱ्या रस्त्यावरून पूल ओलांडून रायकर पाडय़ाच्या पलीकडच्या तीरावर आले होते. थेट गाडी घेऊन पलीकडे जाता येत असल्याने त्या बाजूस पर्यटकांची अधिक गर्दी झाली होती. दुधाळ पाण्यात मनसोक्त भिजत पर्यटक जलपर्यटनाचा आनंद घेत होते.
या बंधाऱ्याविषयी स्थानिक ग्रामस्थांना विचारले असता त्यांना अधिक माहिती नसल्याचे जाणवले. एका ग्रामस्थाने हा बंधारा ब्रिटिशांच्या काळात बांधला असल्याचे सांगितले. वाहून जाणारे भातसा नदीचे पाणी अडविल्यास याचा फायदा ग्रामस्थांना होऊ शकतो या हेतूने हा बंधारा बांधला असल्याचे ते सांगतात. बंधाऱ्याच्या झेड आकाराविषयी अधिक माहिती नसल्याचे ते सांगतात. ‘‘भातसा नदी बारमाही वाहणारी नदी आहे. त्यामुळे कोणताही ऋतू असो, येथील नदीपात्र कधी कोरडे पडत नाही. या बंधाऱ्यामुळे तर पाणी अधिक साठून राहते, त्याचा फायदा आम्हाला मिळतो. राज्यात सर्वत्र दुष्काळ पडला असला तरी येथे मुबलक पाणी आहे,’’ असे सांगताना या ग्रामस्थाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकतात.
पावसाळय़ात तर येथील परिसर निसर्गसौंदर्याने फुलून येतो. सर्वत्र हिरवाई नटलेली असते आणि या हिरवाईच्या मधून वाहणारी ही दुधाळ भातसा नदी अधिक सुंदर वाटते. या ‘झेड’कृती बंधाऱ्यामुळे येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसते. हा बंधारा म्हणजे भातसा नदीच्या कोंदणातील हिरा आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भातसा बंधारा, वाशिंद
कसे जाल?
’ कल्याण-कसारा मार्गावर वाशिंद स्थानकावर उतरल्यावर चालत १० मिनिटांच्या अंतरावर हा बंधारा आहे.

भातसा बंधारा, वाशिंद
कसे जाल?
’ कल्याण-कसारा मार्गावर वाशिंद स्थानकावर उतरल्यावर चालत १० मिनिटांच्या अंतरावर हा बंधारा आहे.