कल्याण : ठाणे रेल्वे स्थानकातील नव्याने विस्तारित करण्यात आलेल्या फलाट क्रमांक पाचच्या रेल्वे रुळाजवळ मुसळधार पावसाचे पाणी तुंबले आहे. हे पाणी वाहून जाण्यासाठी मार्गिका नसल्याने मुसळधार पावसाचे प्रमाण वाढले की हे पाणी फलाट क्रमांक पाचच्या रूळांवर येत आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरण आणि विस्तारिकरण करण्याचे काम दोन महिन्यापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने विक्रमी वेळेत पूर्ण केले. पावसाळ्यापूर्वी घाईघाईत ही कामे पूर्ण करण्यात आली. ही कामे करताना विस्तारित फलाटावर कायमस्वरुपी निवारा न उभारण्यात आल्याने पावसाचे पाणी थेट फलाटावर पडून प्रवासी भिजत होते. फलाटावर पाण्याची तळी साचत होती. याविषयी ‘लोकसत्ता’ने प्रवाशांच्या तक्रारीवरून आवाज उठविताच रेल्वे प्रशासनाने निवारा नसलेल्या फलाटाच्या भागात बांबूचा आधार देऊन त्यावर हिरवी जाळी टाकून प्रवासी भिजू नयेत म्हणून आडोसा उभा केला आहे.
हेही वाचा…डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा जीवघेणा प्रवास, लोकल पकडण्यासाठी रेल्वे मार्गातून उड्या
फलाट क्रमांक पाच लगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटार नाही. अनेक कामे याठिकाणी रेल्वे प्रशासनाला करायची आहेत. त्यामुळे या भागातील गटारे, या भागात लोखंडी रोधक टाकणे ही कामे शिल्लक आहेत. या शिल्लक कामांचा फटका आता मुसळधार पावसाच्या माध्यमातून प्रवाशांना बसण्यास सुरूवात झाली आहे.