कल्याण- उल्हासनगर पालिका आणि कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीवरील शहाड येथे रेल्वे मार्गालगत उल्हासनगर हद्दीत पालिका अधिकाऱ्यांना न जुमानता नाला बुजवून भूमाफियांनी बेकायदा बांधकामे केली. मार्बलच्या व्यावसायिकांनी मनमानी करून नाल्याचे प्रवाह बुजविले. थोडा पाऊस पडला तरी शहाड येथील अंबिकानगरचा चार ते पाच हजार लोकवस्तीचा परिसर पाण्याखाली जातो, अशी माहिती या भागातील रहिवासी ॲड. ज्ञानेश्वर देशमुख यांनी दिली.
यापूर्वी शहाड भागात असा प्रकार घडत नव्हता. गेल्या वर्षी उल्हासनगर पालिका हद्दीत रेल्वे मार्गाजवळ भूमाफियाने अधिकाऱ्यांच्या सहमतीने नाल्यावर बांधकाम केले. नाल्याच्या प्रवाहाच्या बाजुने संरक्षित भिंत बांधून नाला बंदिस्त केला. तेव्हापासून हा प्रकार सुरू आहे. नैसर्गिक प्रवाह बुजवू नयेत हा कायदा असताना उल्हासनगरमध्ये नाला बुजविण्याचे धाडस माफियाने केले कसे, असा प्रश्न रहिवासी करतात. नाल्यावर बांधकाम करण्यासाठी उल्हासनगर पालिकेच्या नगररचना विभागाने एका माफियाला बांधकाम परवानगी दिली. ही परवानगी देऊ नये म्हणून आपण उल्हासनगर पालिका आयुक्त, नगररचना अधिकाऱ्यांना पत्रे दिली. त्याची दखल घेतली नाही, अशी माहिती उल्हासनगरचे नगरसेवक राजेंद्र भुल्लर यांनी दिली. आपल्या तक्रारींमुळे पालिकेने बंदिस्त नाला खुला केला होता. माफियाने तो बुजवून टाकला, असे भुल्लर यांनी सांगितले.
उल्हासनगरमधील गोलमैदान, खेमाणी, फर्निचर बाजार, नेहरू चौक वस्तीमधील पावसाचे पाणी बाळकृष्णनगर, राजीव गांधी नगरमधील ३० फूट रूंदीच्या मोठ्या नाल्यात वाहून येते. हे पाणी शहाड रेल्वे मार्गिकेजवळ पाच फुटाच्या अरुंद मार्गिकेतून शहाड पश्चिमेत अंबिकानगर भागातील नाल्याच्या दिशेने येते. रेल्वे मार्गिकेजवळ अरुंद वाटेमुळे पाणी कोंडते ते शहाड फाटक, रोहिदास नगर, महात्मा गांधीनगर, राजीव गांधीनगर, गुरुद्वारा, शहाड पूर्व, पश्चिम, घोलपनगर, नव अंबिकानगर, नवीन मोहने रस्ता, योगीधाम, गावठाण, मार्बलनगर परिसरात पसरते, अशी माहिती ॲड. देशमुख यांनी दिली.
कल्याण डोंबिवली पालिकेने या भागात योग्यरितीने नालेसफाई केली नाही. नाल्यावर बांधकाम होत असताना कडोंमपाच्या अधिकाऱ्यांनी उल्हासनगर पालिका अधिकाऱ्यांना सावध करणे आवश्यक होते. अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या. पाणी ओसरल्यानंतर या भागात चिखल, दुर्गंधी पसरते.
कपील पाटील यांचे आदेश
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपील पाटील यांनी अंबिकानगर येथे भेट दिली. माजी आ. नरेंद्र पवार, शक्तिवान भोईर, प्रेमनाथ म्हात्रे, अंबिकानगर रहिवासी उपस्थित होते. शहाड येथील तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा. रेल्वे, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कार्यवाही करावी, असे आदेश मंत्री पाटील यांनी दिले.
उल्हासनगर भागातून रुंद नाल्यातून वाहून येणारे पाणी शहाड रेल्वे मार्गिकेजवळ अरुंद मार्गिकेतून शहाड पश्चिमेत जाते. वेगवान पाण्याचा प्रवाह अचानक रेल्वे मार्गाजवळ कोंडतो. थोडा पाऊस पडला तरी अरुंद नाला भागात पाणी तुंबते. याठिकाणी नाला सफाई करण्यात आली. पाणी तुंबू नये म्हणून पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे.
जमीर लेंगरेकर उपायुक्त ( उल्हासनगर महापालिका)
नाल्यावर बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा. लोकांचे होणारे नुकसान या अधिकाऱ्यांच्या वेतन, भत्त्यामधून वसूल करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.
ॲड. ज्ञानेश्वर देशमुख