कल्याण : कल्याण पूर्व भागातील गुन्हेगारांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पोलिसांनी या भागातील गुन्हेगारांना तडीपार केले. विशाल गवळी तुरुंगात आहे. तरीही कल्याण पूर्वेतील गुन्हेगारांचे दहशत माजविण्याचे उद्योग कमी होत नसल्याने नागरिक भयभीत आहेत. कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी भागात शनिवारी रात्री एका कलिंगड विक्रेता आणि त्याच्या सहकाऱ्यावर कोयता टोळीने कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे.
या कलिंगड विक्रेत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या कोयता टोळीवर गुन्हा दाखल केला आहे. समीर उर्फ रवी रेड्डी, मनीष चव्हाण, अविनाश झा अशी गुन्हा दाखल इसमांची नावे आहेत. त्यांची कल्याण पूर्व आडिवली, ढोकळी भागात प्रचंड दहशत आहे. ते या भागातील हातगाडी, फेरीवाले, विक्रेत्यांकडून हप्ते घेतात, असे तक्रारदार कलिंगड-भाजीपाला विक्रेता अक्षय कवडे (२४) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.
विक्रेता अक्षय कवडे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण मुळचे धारशिव जिल्ह्यातील रहिवासी आहोत. आपण उपजीविकेसाठी हसन शेख, हुसेन शेख यांच्या सहकाऱ्याने कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी भागातील काका ढाब्याच्या बाजुला विजय पाटीलनगर भागात भाजीपाला, कलिंगड विक्रीचा व्यवसाय करतो. आपण नाशिकहून कलिंगड मागवली होती. हे वाहन शनिवारी रात्री ११ वाजता आपल्या दुकानाजवळ आले होते. हसन, हुसेन आणि आपण स्वता कलिंगड ट्रकमधून उतरून घेण्याचे काम करत होतो. त्यावेळी तेथे आडिवली भागात दहशत असणारे इसम रवी रेड्डी, अविनाश झा, मनीष चव्हाण आले.
रवी रेड्डी यांनी ढिगामधील दोन कलिंगडे काढून घेतली. आपण त्यांच्याकडे कलिंगडाचे पैसे मागितले. त्यांनी आपण या भागाचे भाई आहोत. माझ्याकडे कसले पैसे मागतोस असे बोलून विक्रेता अक्षय यांंना शिवीगाळ करून रेड्डी याने त्यांच्या दुचाकीमधून कोयता बाहेर काढला. तो हवेत फिरवत आता कोणी मध्ये पडले तर त्याला मारून टाकीन, अशी भाषा करत रवी रेड्डीने अक्षय कवडे आणि त्याच्या साथीदारावर कोयत्याने हल्ला चढविला.हा प्रकार पाहून लोक सैरावैरा पळाली. समीर रेड्डीचे दोन साथीदार मनीष, अविनाश यांनी अक्षय, हुसेन यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या तिघांच्या तावडीतून सुटून अंधाराचा फायदा घेत अक्षय, हुसेन मानपाडा पोलीस ठाण्यात पोहचले.
दोघांना कोयत्याच्या गंभीर दुखापती झाल्या होत्या. शास्त्रीनगर रुग्णालयातून दोघांना कळवा येथील छत्रपती शिवाजी रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. कल्याण पूर्वेतील गुन्हेगारांचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कंबरडे मोडले आहे. तरीही या भागातील गुंडांची दहशत कमी होत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. पोलिसांनी रेड्डी, मनीष आणि झा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.