उंबर्डे येथे प्रकल्प उभारणार; कल्याण, डोंबिवलीसह अंबरनाथ, बदलापूर शहरांना दिलासा
शलाका सरफरे, कल्याण</strong>
कल्याण-डोंबिवली शहरांत मोठय़ा प्रमाणात निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उंबर्डे येथे प्रकल्प उभारण्याच्या कामास राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडत असलेला हा प्रकल्प आता दृष्टिपथात आला असून या प्रकल्पामुळे कल्याण-डोंबिवलीसह अंबरनाथ, बदलापूर आणि आसपासच्या शहरांतील जैव कचऱ्याची विल्हेवाट लावणेही शक्य होणार आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पात तीन मेट्रिक टन जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावता येणार आहे.
कल्याण, डोंबिवलीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. उंबर्डे येथे जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही यामध्ये होता. सद्य:स्थितीत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतून निघणाऱ्या जैव कचऱ्यावर तळोजा येथे प्रक्रिया केली जाते. मात्र कचऱ्याची वाहतूक आणि त्यावरील प्रक्रियेचा खर्च पालिकेसाठी डोईजड ठरत होता. तसेच अनेक ठिकाणी प्रक्रियेविना असा कचरा टाकण्याचा प्रकराही वाढीस लागल्याने शहरावर आरोग्याचे संकट वाढीस लागले होते.
पालिकेने उंबर्डे येथे खासगी कंत्राटदाराला ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर काम दिले होते. त्यानुसार संबंधित कंपनीने प्रकल्प बांधून तयार केला आहे. तो सुरू करण्यास काही वर्षांपूर्वी प्रदूषण मंडळाने तात्पुरती मंजुरी दिली, पण कायमस्वरूपी मंजुरीसाठी महापालिकेने मंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. अखेर या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. आठवडय़ाभरातच हा प्रकल्प सुरू होईल अशी माहिती पर्यावरण विभागाचे उपअभियंता गोपाळ भांगरे यांनी दिली.
प्रकल्प काय?
* कल्याण-डोंबिवली महापालिकेने ‘एन-व्हिजन’ या गुजरातच्या कंपनीला दहा वर्षांसाठी ‘बांधा- वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीचे कंत्राट दिले होते. उंबर्डे येथे दोन एकर जागाही दिली. तीन टन जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे.
* रुग्णालयातील प्रत्येक खाटेमागे कंत्राटदार डॉक्टरांकडून प्रत्येक किलो जैव कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी ३५ रुपये आकारणार आहे.
* दररोज कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून ८५० ते ९०० किलो तर इतर भागातून साधारण १००० किलो जैव कचरा गोळा होत असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे उपअभियंता गोपाळ भांगरे यांनी दिली.
कल्याण-डोंबिवलीत २४५ रुग्णालये
३३० दवाखाने
१४० पॅथॉलॉजी लॅब