ठाणे : गेले अनेक वर्षे कागदावर असलेले फेरिवाला धोरण प्रत्यक्षात उतरविण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या असून यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पथ विक्रेता समिती गठीत करण्यासाठी पालिकेने निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीद्वारे समितीमध्ये पथ विक्रेत्यांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे. या समितीमुळे ठाण्यात फेरिवाला धोरणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात फेरिवाला धोरण राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. हे धोरण राबविण्यासाठी पालिकेने नगर पथविक्रेता समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पालिकेने २०१९ मध्ये शहरातील फेरिवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्या आधारे पालिकेने ठाणे शहरात केवळ ६ हजार फेरीवाल्यांची नोंद केली होती. यापैकी केवळ २ हजार फेरीवाल्यांनी गेले अनेक वर्षे फेरिवाला व्यवसाय करीत असल्याचे पुरावे प्रशासनाकडे जमा केले होते. यानंतर पालिकेने फेरिवाल्यांची १३६५ एवढी फेरिवाल्यांची संख्या निश्चित केली होती. यामधून फेरिवाला सदस्यांची निवड केली जाणार होती. परंतु यासाठी निवडणुक झालेली नसल्यामुळे समिती गठीत होऊ शकलेली नव्हती. दरम्यान, ठाणे महापालिकेने आता ही समिती गठीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणुक कार्यक्रम जाहीर

नगर पथ विक्रेता समिती गठित करण्यासाठी महापालिकेने निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, २६ मार्च रोजी मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. २७ आणि २८ मार्च रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत ठाणे महापालिका मुख्यालय, तळ मजला येथे नामनिर्देशन पत्राचे वाटप केले जाणार आहे. १ आणि २ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार आहे. ३ एप्रिल रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. ४ तारखेला आक्षेप अर्ज स्विकारले जाणार आहेत. त्यानंतर ७ एप्रिल रोजी आक्षेप अर्जावर सुनावणी घेतली जाणार आहे. ८ तारखेला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे. माघारी नंतरची उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. ११ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून प्रभाग समिती कार्यालयात मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्याच दिवशी ५ वाजता मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

ठाणे पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, वाहतुक पोलीस उपायुक्त, नगर नियोजन अधिकारी, आरोग्य अधिकारी असे पाच पदसिद्ध सदस्य आहेत. याव्यतिरिक्त फेरीवाल्यांचे ८, सामाजिक संस्थांमधील २, गृहनिर्माण सोसायटीमधील २ आणि व्यापारी संघटनामधील एक प्रतिनिधी समितीत असणार आहेत. त्यातील फेरिवाला सदस्य निवडीसाठी निवडणुक होणार आहे.