घरोघरी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांना राष्ट्रीय कार्यासाठी एकत्र आणण्याच्या हेतूने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रथेचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये समाजाला एकत्र आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला हा सण स्वातंत्र्योत्तर काळात मात्र पुरता बदलून गेला आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि देणग्यांच्या पैशांवर हा उत्सव आता अवलंबून राहिलेला नाही. मोठे प्रायोजक आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या माध्यमातून या उत्सवाला पुरते इव्हेंटचे स्वरूप आले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील गणेशोत्सवही त्यास अपवाद नाही. प्रत्येक नाक्यावर उभी राहिलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची मंडळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर अतिक्रमणे करू लागली आहेत.

रस्त्यांवर खणलेले खड्डे, परवानगी न घेता वाहतुकीला अडथळा करून उभारलेले मंडप, रात्री उशिरापर्यंत चालणारा डीजेंचा धांगडधिंगाणा, त्यामुळे ध्वनिप्रदूषणाने गाठलेली कमाल मर्यादा, विसर्जन मिरवणुकींच्या माध्यमातून शहराला वेठीस धरण्याचे प्रकार आणि संरक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या पोलिसांवर उचलले गेलेले हात.. यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात अशा अनेक नकारात्मक गोष्टी घडल्या. न्यायालयाने हस्तक्षेप करून शासकीय यंत्रणांना दिलेल्या उत्सवातील सूचनांचे पुरेसे पालन होत नसल्याचे या निमित्ताने दिसून येत होते. आनंद, उत्साह आणि सकारात्मक गोष्टींचा प्रसार करणाऱ्या या उत्सवाला नकारात्मकतेचे लागलेले गालबोट विवेकी विचारांच्या नागरिकांना दुखावणारे होते. एका बाजूला हे नकारात्मक चित्र निर्माण होत असताना दुसऱ्या बाजूला सकारात्मक पद्धतीने सुरू असलेला पारंपरिक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे उपक्रमही सुरू झाले. त्याचे प्रमाण कमी असले तरी दिलासादायक होते. मात्र दणदणाटी उत्सवाच्या मागे हा उत्सव झाकोळून गेला होता. पर्यावरण संवर्धन देण्यासाठी झटणारी मंडळे आणि त्यादृष्टीने पुरेपूर काळजी घेणारे आयोजक अत्यंत मोजक्या ठिकाणी पाहायला मिळाले. गणेशोत्सव मनोरंजनाचे नव्हे तर समाज जागृतीचे माध्यम असल्याचे चित्र या मंडळांमुळे कायम राहिले. निर्माल्याच्या माध्यमातून होणारे खाडी प्रदूषण रोखण्यासाठी तरुण वर्गाने विविध ठिकाणी राबवलेल्या जागृती मोहिमा खाडीच्या प्रदूषणात कमालीची घट करणाऱ्या ठरल्या. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक विसर्जन घाटाची स्वच्छता करून याच तरुणाईने पुढील काळातील मोठे अस्वच्छतेचे संकट दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले तर त्यांच्या बरोबरीला ठाणे महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेनेही व्यापक नियोजन करून पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाने गेल्या काही वर्षांची परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. जलस्रोतांमध्ये विसर्जित होणाऱ्या गणेशमूर्तीची संख्या कमी करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलाव, मूर्तिदान केंद्र आणि निर्माल्य संकलन व्यवस्थेमुळे ठाण्यातील पर्यावरणाला दिलासा मिळाला. एकीकडे ठाणे महापालिकेकडून व्यापक प्रमाणात हे उपक्रम सुरू असताना आसपासच्या इतर महापालिकांमध्ये मात्र तितक्या आग्रहीपणे हे प्रयत्न होताना दिसले नाहीत. उत्सवांमधल्या धांगडधिगाण्यापाठीमागे अशा चांगल्या गोष्टी पूर्णपणे झाकून गेल्या. मात्र या चांगल्या उपक्रमांच्या माध्यमातून सुरू असलेल्या उत्सवांमधील विवेकवादी चळवळींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विवेकी विचारांचा प्रचार आणि प्रसार झाल्यास पुढील काही वर्षांमध्ये टिळकांच्या प्रेरणेतील गणेशोत्सव पाहायला मिळू शकेल.

नागरी हक्कांवरील अतिक्रमणे आणि दणदणाटी उत्सव..

गणेशोत्सवाच्या दीड महिना आधीपासून शहरातील विविध भागांमध्ये अनेक गणेशोत्सवांनी आपली मंडपे उभारण्यास सुरुवात केली. मात्र असे करताना वाहतुकीचा अडथळा, नागरिकांची गैरसोय आदी गोष्टींचा विसर गणेशोत्सव मंडळांना पडला. घोडबंदर परिसरातील खेवरा सर्कल परिसरातील एका राजकीय नेत्याने दरवर्षीच्या परंपरेनुसार रस्त्यावर आणि तेथील एका बस थांब्यावर अतिक्रमण करून नागरिकांची कोंडी केली. यंदा तर या आयोजकाने तेथील बस थांबा मुळासकट कापून मंडप साकारला होता. गेली काही वर्षे टीका होत असतानाही निर्धावलेल्या नेत्यांनी हे धारिष्टय़ केले. त्यामुळे इतका मुजोरपणा येतो कुठून, असा सवाल या निमित्ताने विचारला जात होता. वर्तकनगर, वैतीवाडी, पाचपाखाडी, बी-केबीन, नौपाडा, घोडबंदर परिसर यांसह शहरातील अनेक भागांमध्ये अशी रस्ते अडवणारी मंडळे दिसून आली. या मंडपांबरोबरच शहरातील बॅनर आणि फलकांमुळे होणारे विद्रूपीकरण या निमित्ताने पुन्हा आधोरेखित झाले. अनेक मंडळांच्या मंडप आणि शहरातील रस्त्यांच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात बॅनर्स लावण्यात आले होते, तर उत्सवांच्या निमित्ताने सुरू असलेला ध्वनिक्षेपकांचा आवाज किमाल मानांकाच्या दुप्पट होता. त्यामुळे यंदाच्या वर्षीही मोठय़ा प्रमाणात दणदणाटी उत्सव ठाणेकरांना सहन करावा लागला. शहरातील अनेक भागांमध्ये आवाजाची पातळी १०० ते ११० डेसिबल्सपेक्षा जास्त होती. शांतता क्षेत्रांचे भानही या मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत ठेवले नव्हते. केवळ मंडळच नव्हे तर अनेक घरगुती गणेश विसर्जनासाठी मोठय़ा प्रमामात वाद्यांचा वापर केला जात होता. डॉ. महेश बेडेकर यांनी ठाण्यातील विविध भागांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरातील आवाजामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे म्हटले आहे. मात्र अशा वेळी पोलिसांकडून पुरेशी कारवाईसुद्धा केली जात नव्हती. यंदाच्या उत्सवांमध्ये शहरात वाजणाऱ्या बॉलीवूड चित्रपटातील आयटम साँगचे प्रमाण कमी असल्याची गोष्ट समोर आली आहे. मात्र आवाज कमी करण्याच्या दृष्टीने मात्र अद्याप पावले उचलली गेली नाहीत. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी नोंदवून या आवाजाला थांबवण्याची विनंती केल्याचेही दिसून आले आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांनी या गोष्टींची दखल घेऊन कारवाई करण्याची गरज असताना तसे होत नसल्याचे या निमित्ताने प्रकर्षांने जाणावले.

कृत्रिम तलावांचा यशस्वी प्रयोग.. 

गेली काही वर्षांमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची संकल्पना मांडून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यामध्ये ठाणे महापालिकेने आग्रही भूमिका घेतली असून यंदाही ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. या कृत्रिम तलावांचा वापर मोठय़ा प्रमाणामध्ये नागरिकांनी केला. त्यामध्ये मासुंदा तलावात उभारण्यात आलेल्या तलावामध्ये ७३३ मूर्तीचे विसर्जन झाले. रायलादेवी येथील दोन कृत्रिम तलावात १,०८८ गणेशमुर्तीचे विसर्जन झाले. उपवन आणि नीळकंठ वुड्स येथे १,००२ मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या. अंबाघोसाळे येथील कृत्रिम तलावात ११८ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत करण्यात आलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेमध्ये १,३७२, कळवा प्रभागात ६८९ तर मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत २,१६१ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महापालिकेचा कृत्रिम तलावांचा प्रयोग यशस्वी झाला. याबरोबरच महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्यामार्फत शहरातील प्रत्येक विसर्जन घाटावर निर्माल्य संकलित करण्यात आले होते. विविध संस्था आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन दीडशे टन निर्माल्य आणि थर्माकोल, प्लास्टिक, हार असे ७० टन अविघटनशील पदार्थ खाडीत विसर्जित होण्यापूर्वी बाहेर जमा केले. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात होणारे खाडींचे प्रदूषण रोखण्यात यश मिळाले आहे.

गेल्या वर्षी सुमारे १८० टन निर्माल्य आणि कचरा जमा झाला होता. त्या तुलनेत यंदा निर्माल्य कमी प्रमाणामध्ये संकलित झाले. पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचा अवलंब केल्याचा हा परिणाम असल्याचे समर्थ भारत व्यासपीठाचे भटू सावंत यांनी स्पष्ट केले आहे. या सगळ्या निर्माल्याचे जैविक खतामध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्याचा वापर उद्यानांसाठी केला जाणार आहे. यंदा रोटरी क्लब ऑफ गार्डन सिटी यांनी प्रत्येक गणेश कलाकेंद्रात जाऊन निर्माल्यासाठी वेगळी पिशवी दिली होती. त्यातून अनेकांनी निर्माल्य संकलित करून विसर्जन घाटावरील कार्यकर्त्यांकडे सोपवले. त्यामुळे खऱ्या अर्थाने यंदा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव ठाण्यात व्यापक प्रमाणात साजरा झाला असे म्हणता येईल.