स्मार्ट सिटीच्या यादीत आपल्या शहराचा क्रमांक लागावा यासाठी महाराष्ट्रातील सर्वच महापालिकांची धावपळ सुरू झाली आहे. ठाणे महापालिकासुद्धा यात मागे नाही. स्मार्ट सिटी म्हणजे काय? स्मार्ट सिटीमध्ये शहराचा कायापालट कसा होणार, नागरिकांना महापालिकेकडून काय अपेक्षा आहेत, कोणत्या सुखसुविधा नागरिकांना या माध्यमातून महत्त्वाच्या वाटतात याचे सर्वेक्षणसुध्दा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले. यात जवळ जवळ २० लाखांहून अधिक ठाणेकरांनी आपली मते नोंदविली. यात प्रामुख्याने एक मुद्दा शहराच्या विविध भागांतून समोर आला तो म्हणजे महिलांची सुरक्षितता. आपण कितीही स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करू लागलो तरी आपल्या शहरात महिला सुरक्षित आहेत का?
तर याचे उत्तर नाही असेच लाखो ठाणेकरांनी नोंदविले, किंबहुना महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे पोलिसांबरोबरच ठाणे महापालिकेनेदेखील सजग होणे आवश्यक असल्याचे मत ठाणेकरांनी नोंदविले. ठाणे स्मार्ट सिटीसाठी नागरिकांचा सहभाग असावा यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने गडकरी रंगायतनमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ठाण्याचे पोलीस सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, स्मार्ट सिटीसाठी नागरिकांना स्मार्ट होणे आवश्यक आहे. यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना आम्ही करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. शासनाकडून पोलिसांना मिळत असलेल्या अनुदानापैकी ९० टक्के अनुदान हे पोलिसांच्या पगारावर खर्च होते, तर उरलेल्या १० टक्के अनुदानातून शहरात उपाययोजना करण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर नागरिकांकडून जवळ जवळ कोटीच्या घरात वसूल केलेल्या दंडातून अनेक उपाययोजना राबवीत असल्याचे त्यांनी संपूर्ण रंगायतनमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र हे स्मार्ट सिटीचे लक्षण नव्हे असे सांगत लक्ष्मीनारायण म्हणाले की, दंड आम्ही आमच्या सोयीसाठी वसूल करत नाही, तर नागरिकांनी नियम मोडू नयेत, ज्यावेळी दंड म्हणून आमची एकही पावती फाडली जाणार नाही, त्यावेळी खऱ्या अर्थाने ठाणे शहर हे निश्चितच स्मार्ट होईल.
महिलांची सुरक्षितता ही सर्वाचीच जबाबदारी आहे, त्या दृष्टीने पोलीस विभागाबरोबरच महापालिकेनेही पावले उचलणे आवश्यक असल्याचा सूर निघाला. तसेच नुसताच ठाणे शहराचा विचार या स्मार्ट सिटीमध्ये करून चालणार नाही तर कळवा, मुंब्रा, दिवा या ठाणे महापालिका क्षेत्रातील शहराचा समावेश होणे आवश्यक असल्याचे मतही नागरिकांनी यावेळी व्यक्त केले. शहर स्मार्ट होताना ते स्मार्ट करणे ही नुसतीच महापालिकेची जबाबदारी नसून स्मार्ट सिटीचा विचार करताना स्वत:पुरता विचार करून चालणार नाही, तर मी, आम्ही ऐवजी आपण सारे मिळून या शहराला स्मार्ट करण्याची गरज असल्याचे
मत ठाणे शहराचे प्रथम नागरिक महापौर संजय मोरे यांनी नमूद केले. एकूणच स्मार्ट सिटी होताना हे शहर आपले आहे, त्याची स्वच्छता, सुरक्षितता ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबरच प्रत्येक ठाणेकरांची आहे असेच मत या चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आले. एकूणच पायाभूत सुविधा मिळण्याबरोबरच सध्या महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महिलांची सुरक्षितता हा प्रश्न आता ऐरणीवर आहे, आणि त्या दृष्टीने पोलिसांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेने, सजग ठाणेकरांनीही पावले उचलली पाहिजेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
मुशाफिरी : आपण सारे स्मार्ट होऊ या
स्मार्ट सिटी म्हणजे काय? स्मार्ट सिटीमध्ये शहराचा कायापालट कसा होणार,
Written by झियाऊद्दीन सय्यद
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-12-2015 at 02:52 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will be all smart