कल्याण : ‘मागील पंधरा वर्षापासून विकासापासून दूर असलेल्या कल्याण पूर्व विभागाचा विकास करण्यासाठी आता आपणास साथ द्या, आपण एक नवा इतिहास घडवू,’ असे समाज माध्यमी फलक शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी सामायिक केले आहेत. त्यामुळे महेश गायकवाड कल्याण पूर्व मतदारसंघातून शिवसेनेतून बंडखोरी करून महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरुध्द अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या दोन वर्षापासून महेश गायकवाड शिवसेनेतून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची स्वप्ने पाहत होते. त्यांना शिवसेनेच्या वजनदार नेत्यांचा पाठिंबा होता. या बळावर आपली उमेदवारी निश्चित होऊन आपणच कल्याण पूर्वेचे दावेदार असणार, असे वातावरण निर्माण करण्यात शहरप्रमुख महेश गायकवाड यशस्वी झाले होते.

हेही वाचा…उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे गुरुवारी कल्याण, डोंबिवलीत

महेश गायकवाड यांच्या प्रभावी हालचालींवरून भाजपचे प्रस्थापित आमदार गणपत गायकवाड यांच्यात वितुष्ट येत गेले. हा वाद अखेर पोलीस ठाण्यातील गोळीबारापर्यंत गेला. आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शहरप्रमुख महेश यांच्या गोळीबार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या दोघांमधील वाद अधिकच चिघळला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही धुसफूस पुन्हा सुरू झाली आहे. भाजपने कल्याण पूर्वेत कोणीही उमेदवार द्यावा आपण त्यांचे काम करू, पण गणपत गायकवाड यांना किंवा त्यांच्या घरात उमेदवारी दिल्यास आपण त्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका महेश यांच्यासह शिवसेनेतील एका प्रभावी गटाने घेतली आहे.

हेही वाचा…उमेदवार, पक्षीय कार्यालयांसमोरील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांमुळे कल्याण-डोंबिवली शहरे वाहन कोंडीत

त्यामुळे महेश गायकवाड यांनी शिवसेनेच्या वरिष्ठांंना न जुमानता आता नव्याने समाज माध्यमी फलक प्रसिध्द केले आहेत. या फलकात म्हटले आहे, ‘दार थोपटून आता बदल होणार नाही, आता जनसामान्यांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय विकास होणार नाही. द्या माझी साथ आपण घडवू नवा इतिहास. वारसदार जनकल्याणाचा आधार जनसामान्यांचा’ या फलकातील इशाऱ्यावरून महेश गायकवाड अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचा सूचक इशारा मानला जात आहे. कल्याण पूर्वेतील अनेक नागरिकांनी रस्त्यावर उतरून महेश गायकवाड यांना समर्थन दिले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will create new history shiv sena city chief mahesh gaikwad banner in kalyan east sub 02