-भगवान मंडलिक
बाहेर मुलांकडून त्रास दिला जात आहे. बदनामीच्या धमक्या दिल्या जात आहेत. आपणास खूप नैराश्य आले आहे. एवढे जरी मुलीने घरात सांगितले असते तर आम्ही तिच्या पाठिशी उभे राहिलो असतो. एवढे टोकाचे पाऊल तिला उचलू दिले नसते, असे कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील मयत मुलीच्या कुटुबीयांनी सांगितले.
नक्की वाचा >> मित्रांकडून गैरफायदा; लैंगिक अत्याचार अन् अश्लील व्हिडीओ; कल्याणमध्ये तरूणीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
मयत मुलगी बारावी वाणिज्य शाखेत ७१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. प्रथम वर्ग महाविद्यालयीन प्रवेशाची तयारी या मुलीने सुरू केली होती. तीन वर्षाच्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर नोकरी, अशा आनंदात असतानाच, मुलीने जीवन संपविल्याने कुटुंबीय अस्वस्थ आहेत.
मयत मुलीचे वडील मुंबईत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. घरात आई, लहान दोन भाऊ आहेत. घरातील नोकरीच्या उंबऱठ्यावर असलेली मुलगी गेल्याने मयत मुलीचे आई, वडिल शोकाकुल आहेत. मुलगी बारावीची परीक्षा ७१ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. येत्या तीन वर्षात मुलगी पदवीधर होऊन नोकरी करेल. घरात आर्थिक साहाय्याला तिची मदत होईल, अशी गणिते कुटुंबीय करत असतानाच ही दुर्देवी घटना घडली.
काटेमानिवलीत राहत असलेल्या इमारतीमधील एका समवयस्क मुलीशी मयत मुलीची ओळख झाली. या ओळखीतून मित्र, मैत्रिणी असा गट तयार झाला. या गटातून मयत मुलीला त्रास देण्यास तरुणांनी सुरूवात केली. त्याला मयत मुलीची इमारतीमधील मैत्रिण साथ देऊ लागली. सात तरूण मित्र आणि एक मैत्रिण असा गट मयत मुलीला शारीरिक, मानसिक त्रास देत होता. आपला त्रास कमी करण्यासाठी गटातील प्रत्येक मित्राला मयत मुलगी मदतीसाठी याचना करायची. त्याचा गैरफायदा घेत मित्र तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. अशाप्रकारे गेल्या दीड ते दोन वर्षापासून तरूणी काटेमानिवली परिसरात राहत असलेल्या तरूणांच्या जाळ्यात फसली. आरोपी तरूणी आरोपी सात तरूणांच्या आणि मयत मुलीच्या बाजुने दोन्ही बाजुने संशयास्पद भूमिका बजवायची.
सातही तरूणांनी दीड वर्षात या तरूणीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात तरूणीचा एक नातेवाईक सहभागी होता, असे पोलिसांनी सांगितले.
तरूणांकडून वेळोवेळी होत असलेल्या अत्याचारामुळे मयत तरुणी अस्वस्थ झाली होती. आता आपण कोणाजवळ हे बोललो तर आपली, कुटुंबीयांची बदनामी होईल अशी भीती मयत तरुणीला होती. त्यात आरोपी तरूणांकडून तरूणीला त्रास देण्याचे प्रकार वाढले होते. मयत तरूणी होणारा त्रास कोणाजवळ व्यक्त करत नसल्याने तिचा कोंडमारा झाला होता. ती घरातील स्वच्छतागृहात, गच्चीवर जाऊन एकटीच रडत बसून आपले मन मोकळे करत होती. तिच्या मैत्रीणीला हा प्रकार माहिती होता.
आरोपी तरूण मयत मुलीला तिच्या काढलेल्या लैैंगिक अत्याचाराच्या अश्लिल चित्रफिती समाज माध्यमावर प्रसारीत करण्याची धमकी देत होते. हे घडले तर कुटुंबीय, नातेवाईक काय म्हणतील, असा प्रश्न तरुणीला सतावत होता. हा सगळा प्रकार मयत तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये लिहिलेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहिला आहे. आपण सामान्य कुटुंबातील, समोरीची मुले पैसेवाली. आपण त्यांना पुरून उरू शकत नाही, अशी सुप्त भीती तरूणीमध्ये होती.
रविवारी रात्री मयत मुलीची आई, भाऊ कल्याण पूर्वेत मामाच्या घरी भोजनासाठी गेले होते. तेथील शेवटेच भोजन उरकून मैत्रिणीचा फोन आल्याने मयत तरूणीने मामाच्या घरातून रडतच घरी निघाली. पाठोपाठ आई घरी आली. आई घरात आवराआवर करत असतानाच मयत मुलीची मैत्रिणी इमारतीच्या गच्चीवरून उतरत होती. तिला आईने माझी मुलगी कुठे आहे, असे विचारले. त्यावेळी ती खाली पडली आहे एवढेच सांगितले…इमारतीच्या खाली रक्ताच्या थारोळ्यात मयत तरुणी पडली होती.
दोन मृत्यूपूर्व चिठ्ठ्या
आरोपी तरूणांकडून मयत तरुणीला होणारा त्रास. सात तरूणांचे संशयास्पद वर्तन, मुलीशी होत असलेले तरूणांचे लैंगिक चाळे आणि हाताबाहेर चाललेली परिस्थिती याविषयी मयत तरूणीने २४ मे रोजी मध्यरात्री दीड वाजता दोन ते तीन पानांचे कथन केले आहे. यामध्ये तिने आपल्या मरणाची भाषा केली आहे. शेवटी त्रास असह्य झाल्याने १२ जून रोजी रात्री ९.२८ वाजता (मामाच्या घराकडून स्वताच्या घरी येत असताना रात्री ९.१५ ते ९.२८) मयत तरूणीने शेवटची मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहिली…बस, आज तर काही लिहू शकत नाही. मनातून पूर्ण मेलीय मी. सगळ संपल.
आरोपींची नावे
विजय राजेंद्रप्रसाद यादव (२७, अनिल अपार्टमेंट, साकेतनगर, कल्याण पूर्व), प्रमेय जयेश तिवारी (२२, साकेत बंगला), कृष्णा राजकुमार जैयस्वाल (१८, राजेश्री संकुल, साकेतनगर) सन्नी उर्फ निमेश नंदकुमार ठाकुर (२३, अमरावती अपार्टमेंट, साकेदतनगर), आनंद सुभाषचंद्र दुबे (२७, अनिल अपार्टमेंट, चिंचपाडा रोड,कल्याण पूर्व), शिवम पांडे ( रा. अंबरनाथ), निखिल संजय मिश्रा (१९), काजल जैस्वाल.