कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीतर्फे पालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रणालीचे उन्नत्तीकरण करण्याचे काम शुक्रवारपासून (८ एप्रिल) सुरू केले आहे. या कामासाठी पालिकेचे संकेतस्थळ १ मेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी प्रभाग कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिकेच्या संगणक विभाग उपायुक्त पल्लवी भागवत यांनी केले आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेने २२ वर्षापूर्वी नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने नागरी सेवा देणारी ई-गव्हर्नन्स संगणक प्रणाली सुरू केली. देशातील अशाप्रकारे नागरिकांना ऑनलाईन सुविधा देणारी कल्याण डोंबिवली पालिका ही देशातील पहिली पालिका आहे. मालमत्ता कर, पाणी देयक भरणा, पालिकेचे मागील २८ वर्षातील महासभेत झालेले ठराव, पालिकेच्या ३० हून अधिक विभागांची समग्र माहिती, तेथील कामकाज ही सर्व माहिती रहिवाशांना पालिकेच्या संकेतस्थळावरून घरबसल्या पाहण्यास मिळते. ही संगणक प्रणाली जुनाट झाल्याने अतिशय संथगतीने नागरिकांना ऑनलाईन सुविधा मिळतात. अनेकवेळा ही प्रणाली बंद असते.
गेल्या दीड महिन्यापासून पालिकेचे संकेतस्थळ पूर्ण बंद आहे. त्यामुळे ऑनलाईन माध्यमातून देयक, कर भरणा करणाऱ्या रहिवाशांचे हाल झाले. संगणक प्रणालीचा सर्व्हर कमकुवत होत असल्याने तो गतिमान सेवा नागरिकांना देत नाही. या संथगती ऑनलाईन सुविधेविषयी पालिकेत अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. संगणक विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व्हर संथ असल्याने संकेतस्थळ माध्यमातून ऑनलाईन सुविधा घेताना नागरिकांना अडचणी येतात याची कबुली दिली होती.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ई-गव्हर्नन्स प्रणालीच्या उन्नत्तीकरणाचे काम स्मार्ट सिटी कंपनीने हे काम हाती घेतले आहे. आज, शुक्रवारपासून या कामाला सुरूवात करण्यात आली. त्यामुळे पालिकेच्या संकेतस्थळ माध्यमातून देण्यात येणाऱ्या नागरी सुविधा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत, असे उपायुक्त भागवत यांनी सांगितले.
नागरिकांनी पालिकेच्या प्रभागांमधील नागरी सुविधा केंद्रात जाऊन मालमत्ता कर, पाणी देयक भरणा करावा. केंद्रातील ऑनलाईन, हस्त (ऑफलाईन) पध्दत सुरू राहणार आहे. माहिती किंवा इतर नागरी समस्यांचे अर्ज सुविधा केंद्रात हस्त पध्दतीने स्वीकारले जातील. कर, पाणी देयकाचा रोख, धनादेशाद्वारे भरणा १ मेपर्यंत रहिवाशांनी हस्त किंवा ऑनलाईन प्रणालीतून नागरी सुविधा केंद्रातून करावा.
२४ एप्रिल ते १ मेपर्यंत नागरी सेवा केंद्रातील ऑनलाईन रोख स्वीकारण्याची सुविधा बंद असेल. उन्नत्तीकरण कामामुळे नागरिकांची काही दिवस गैरसोय होणार आहे. याचा विचार करून स्मार्ट सिटी कंपनीकडून होणारे उन्नत्तीकरणाचे काम लवकर पूर्ण होईल, या दिशेने प्रशासनाचे प्रयत्न असणार आहेत, असे उपायुक्त भागवत यांनी सांगितले.