डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली नाक्यावर मशाल स्मृति स्थळाच्या बाजुला मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर स्थानिकांनी गेल्या एक महिन्यापासून लग्नाचा मांडप टाकून ठेवला आहे. पाथर्ली नाक्यावर वाहन कोंडी झाली, अवजड वाहन या भागातून जात असेल तर हमखास लग्नाच्या मंडपाजवळ वाहन कोंडीत अडकून पडतात. त्यामुळे हा मंडप पालिकेने तातडीने काढून टाकण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पाथर्ली नाक्यावर मुख्य वर्दळ आणि वाहन कोंडीचे ठिकाण असुनही पालिकेने या रस्त्यावरील मंडपाला परवानगी दिलीच कशी, असे प्रश्न प्रवासी, परिसरातील रहिवासी करत आहेत. अशाप्रकारे रस्त्यावर मंडप टाकून कोणी व्यक्ति विवाह सोहळे या मंडपात लावण्यास परवानगी देऊन विवाह आयोजकांकडून भाडे वसूल करतो का, याचीही चौकशी करण्याची पुढे आली आहे.
हेही वाचा >>> भावली धरणाचे काम संथगतीने; पर्यावरण मंजुऱ्यांचा खोडा, ठाण्याचा ग्रामीण पट्टा तहानलेलाच
मागील एक महिन्यापासून पाथर्ली नाक्यावर मशाल स्मृति स्थळाच्या बाजुला विवाहाचा मंडप आहे. हा मंडप अनेकांच्या चर्चेचा विषय झाला आहे. विवाह सोहळा असला की तो सुशोभित केला जातो. अन्य वेळी मंडपाचे कापड काढून लाकडी सांगडा फक्त उभा ठेवला जातो. वर्दळीच्या रस्त्यावर जागा अडवून मंडप उभारणीस न्यायालयाची बंदी आहे. अशा परिस्थितीत पालिकेच्या फ प्रभाग विभाग कर्मचाऱ्यांच्या हा मंडप निदर्शनास का आला नाही. फ प्रभागाची फेरीवाला हटाव पथके नियमित या भागात कारवाई करत असतात.
पालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी नियमित या रस्त्यावरुन येजा करतात. त्यांना हा कोंडी करणारा मंडप दिसत नाही का, असे प्रश्न नागरिक करतात. पाथर्ली नाक्यावर स्मशानभूमी दिशेकडील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर अनेक वेळा विवाह सोहळ्यासाठी मंडप टाकला जातो. दोन ते तीन दिवस हा मंडप रस्त्यावर ठेवला जातो. त्यामुळेही या भागात कोंडी होते. पाथर्ली भागात अनेक मोकळ्या जागा असताना मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर विवाहाचे मंडप टाकून आयोजक प्रवाशांना त्रास देऊन काय साध्य करत आहेत, असे प्रश्न नागरिक करत आहेत.
हेही वाचा >>> ठाण्यात काळ्या यादीतील ठेकेदाराला रस्त्यांची कामे, भाजपची चौकशीची मागणी
पालिकेच्या फ प्रभागातील अतिक्रमण नियंत्रण विभागाने वर्दळीच्या रस्त्यावरील पाथर्ली भागातील मंडप तातडीने काढून टाकावा. रस्त्यावर मंडप उभारला म्हणून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पाथर्ली भागात मंडप उभारणीला परवानगी दिली होती. ती परवानगी किती दिवसासाठी दिली होती हे पहिले पाहावे लागेल. परवानगी नंतरही त्या भागात मंडप उभा असेल तर तो तातडीने काढण्यात येईल, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.