ठाणे

मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या १६व्या पुण्यातिथीनिमित्त डोंबिवलीत अष्टगंध एन्टरटेन्मेंटतर्फे रविवारी ‘पुलकित’ हा खास महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पुलंचे लेखन वाचताना अथवा त्यांचे कथाकथन ऐकताना मनावरून हळुवार मोरपीस फिरविल्याचा आनंद मिळतो. त्यामुळे त्यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखांच्या प्रेमात पडून त्यांची अखंड पारायणे करणारे अनेक रसिक आहेत. नव्या पिढीतील बहुतेक कलावंतांनाही पुलंचे साहित्य भुरळ पाडते. असेच सध्याच्या पिढीतील लोकप्रिय कलावंत पुलंना या महोत्सवाद्वारे श्रद्धांजली वाहणार आहेत.    अतुल परचुरे, सुनील तावडे, विघ्नेश जोशी, सुनील जाधव, प्रदीप पटवर्धन, हेमांगी कवी, डॉ. गिरीश ओक, रसिका धामणकर, कल्याणी जोशी, अंजली मायदेव हे कलावंत या पुलकित महोत्सवात सहभागी होत आहेत.

  • कधी : रविवार, १२ जून,
  • वेळ: दुपारी ३.३० वाजता.
  • कुठे:  सावित्रीबाई फुले नाटय़गृह, डोंबिवली (पू.).

 

‘तुम्हीच घडवा तुमचे दागिनेू

ज्वेलर्स अथवा पेढय़ांवर ऑर्डर देऊन दागिने बनविण्याऐवजी स्वत:च दागिने तयार करून शृंगार करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी डोंबिवलीत एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये मोत्यांपासून तयार केलेली चिंचपेटी, तनमणी, तसेच ठुशी, कुडी, तोडे, कंठी  अंगठी, बिंदी आदी चौदा प्रकारचे दागिने तयार करण्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेमध्ये दिले जाणार आहे. १० ते १२ जून या कालावधीत सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत डोंबिवली येथे ही कार्यशाळा होणार आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क- ९८३३३८०५१३.

  • कधी : १० ते १२ जून,
  • केव्हा : वेळ : सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६.
  • कुठे : बी/३, गोपाळ नगर लेन नं-१, डोंबिवली (पू.).

 

सुभेदार वाडा कट्टय़ावर आमटे दाम्पत्य..

कल्याण शहराने नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले आहे. नेमका हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून वर्षभरापूर्वी ‘सुभेदार वाडा कट्टा’ नावाच्या चळवळीचे रोपटे लावले गेले. या उपक्रमाच्या वर्षपूर्ती सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे हे उपस्थित राहणार आहेत. येत्या रविवारी, १२ जून रोजी अत्रे रंगमंदिरात होणाऱ्या या वर्षपूर्ती सोहळ्याच्या पहिल्या सत्रात डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक मिलिंद भागवत त्यांची मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमातून जमा होणारा निधी आमटे दाम्पत्याला आणि दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला जाणार आहे. या कार्यक्रमात सुभेदार वाडा कट्टा स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार असून दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांच्या ‘फिटे अंधाराचे जाळे’ या सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

  • कधी : रविवार, १२ जून,
  • केव्हा : सकाळी ९.४५.
  • कुठे : आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (प.).

 

डी. व्ही. पलुस्कर- एक पुण्यस्मरण

ऐतिहासिक कल्याण शहरात गायन समाजाची स्थापना करून रघुनाथ ऊर्फ काकासाहेब कर्वे यांनी येथील सांस्कृतिक उपक्रमांना सशक्त व्यासपीठ निर्माण करून दिले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त गायन समाजातर्फे येत्या रविवारी ‘डी. व्ही. पलुस्कर- एक पुण्यस्मरण’ ही विशेष मैफल आयोजित करण्यात आली आहे. आनंद विद्याधर ओक हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना अनिरुद्ध गोसावी (हार्मोनियम), ऋग्वेद देशपांडे (तबला), ओंकार जोशी (साईड ऱ्हिदम) साथ करणार आहेत. मैफलीची संकल्पना आणि निवेदन डॉ. विद्याधर ओक करणार आहेत.

  • कधी: रविवार, १२ जून रोजी,
  • केव्हा : सायंकाळी ६ वाजता.
  • कुठे : कल्याण गायन समाज सभागृह, कल्याण (प.).

 

‘इंद्रधनु’ संवाद

सातत्याने दर्जेदार आणि माहितीपूर्ण कार्यक्रम आयोजित करून ठाण्याची सांस्कृतिक श्रीमंती वाढविणाऱ्या इंद्रधनु संस्थेने इंद्रधनु संवाद या मालिकेत तीन दर्जेदार व्याख्याने  चोखंदळ रसिकांसाठी आयोजित केली आहेत. त्यातील दोन व्याख्याने येत्या शनिवार-रविवारी तर तिसरे व्याख्यान पुढील रविवारी होईल. शनिवारी ११ जून रोजी ‘भारत-चीन संरक्षण सिद्धता’ या विषयावर ‘लोकप्रभा’चे कार्यकारी संपादक विनायक परब यांचे व्याख्यान होईल. रविवारी १२ जून रोजी पृथ्वीवरील दक्षिण ध्रुव (अंटाक्र्टिका) आणि उत्तर ध्रुव (आर्टिक) या दोन्ही ध्रुवांवर साहसी पर्यटन करून आलेले राजश्री आणि अनंत काकतकर या जोडप्याचे चित्तथरारक अनुभव ‘दोन ध्रुवावर आम्ही दोघे’ या व्याख्यनाद्वारे ऐकता येतील. या संवादमालेतील तिसरा कार्यक्रम पुढील रविवारी १९ जून रोजी होईल. ‘भारतीय वायू सेना-आजवरचा प्रवास आणि पुढील आव्हाने’ या विषयावर निवृत्त एअर मार्शल अरुण गरूड रसिकांशी संवाद साधतील. तिन्ही संवाद दृकश्राव्य पद्धतीने होतील. प्रवेश विनामूल्य आहे.

  • कधी : ११, १२ आणि १९ जून,
  • केव्हा :  संध्याकाळी- ६ वाजता
  • कुठे : सरस्वती क्रीडासंकुल सभागृह, मल्हार सिनेमागृहासमोर, गोखले रोड, ठाणे (प).

 

चला धरू या अचूक ‘ताल’

तबल्यावरची थाप तालात पडू लागली की जाणकार रसिक स्वाभाविकपणे वादकाला उत्स्फूर्तपणे दाद देतात. वादकाची तबल्यावर पडणारी थाप प्रेक्षकांना ताल धरायला लावते. येत्या आठवडय़ात कल्याणमध्ये तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ताल’ समजून घेण्याची रसिकांना संधी आहे. विशेषत: गायन, वादन आणि नृत्याचे धडे गिरविणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबीर उपयुक्त आहे. कल्याण गायन समाज संचालित म्हैसकर कला अध्यासनातर्फे हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

  • कधी :  १०, ११, १२ जून,
  • केव्हा : सायंकाळी ६ ते ८.
  • कुठे : कल्याण गायन समाज, कल्याण (प.).

Story img Loader