आपल्या गायकीने अवघ्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसरस्वती पंडिता किशोरीताई आमोणकर यांना प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची पर्वणी ठाणेकरांना चालून आली आहे. किशोरीताईंच्या स्वरांनी रसिक श्रोत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आहेत. मात्र यासाठी किशोरीताईंनी घेतलेली मेहनत, तयारी, साधना याचे गुपित यानिमित्ताने उलगडले जाणार आहे. शिवाय या कार्यक्रमाला किशोरीताईंच्या सुमधुर गायनाची किनारही लाभणार आहे.
कधी- शनिवार, ९ जानेवारी वेळ : सायंकाळी ५.३० ते रात्री १०
कुठे- गडकरी रंगायतन, तलावपाळीजवळ, ठाणे(प.)
मराठी गझलची अनोखी मैफल..
योजना प्रतिष्ठानतर्फे नवीन वर्षांच्या प्रारंभी प्रतिभावान कवी सुरेश भट, बदीउज्जमान खावर आणि चंद्रशेखर सानेकर यांच्या अलौकिक मराठी गझलची मैफल आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची संकल्पना गायिका योजना शिवानंद यांची असून या मैफलीत त्या गझल पेश करणार आहेत. संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ संगीतकार डॉ. सुनील कट्टी यांनी या मैफलीतील सर्व गझल संगीतबद्ध केल्या आहेत. तसेच या कार्यक्रमामध्ये नाटय़ कलावंत मदन जोशी हे रसिकांशी संवाद साधणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक हे गझल गद्यचे वाचन करणार आहे. अत्यंत आगळीवेगळी अशी मराठी गझलची ही मैफल विरह, प्रणय, पुकार, वेदना, जीवनविषयक भाष्य अशा विविध भावछटांनी गायन आणि गद्य वाचन यातून रंगवली जाणार आहे.
कधी- १० जानेवारी, वेळ- दुपारी ४.३० वाजता
कुठे- डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर, हिरानंदानी मेडोज, ठाणे(प.)
मासळी फ्रायसोबत मालवणी संस्कृतीची लज्जत
मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आता सरला आहे. त्यामुळे या महिन्यात मांसाहार वज्र्य करणाऱ्यांना सामिष आहाराचे वेध लागले आहेत. याची सुरुवात दणक्यात करायची असेल, तर ठाण्यातील शिवाई नगर येथे भरलेल्या मालवणी महोत्सवाला जरूर भेट द्या. शिवाई नगरातील उन्नती गार्डन मैदानात होत असलेल्या या महोत्सवात गुलाबी थंडी अंगावर झेलत गरमागरम कोंबडी वडे, तळलेले मासे यांची लज्जत चाखता येईल. सोबत सोलकढी आहेच. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणारा हा महोत्सव दहा दिवस चालणार असून त्यातून मालवणी संस्कृतीच्या विविध पैलूंचा आस्वाद घेता येणार आहे. त्यातही विशेष म्हणजे रसिकांना मालवणी ‘दशावतार’ नाटकदेखील येथे पाहायला मिळेल. या महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे या ठिकाणी तब्बल ४० फूट उंचीच्या भव्य शंकर मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. तसेच विविध दूरचित्रवाणी मालिकांतील कलाकारही या महोत्सवाला भेट देणार आहेत.
कधी- शुक्रवार, ८ जानेवारी ते रविवार, १७ जानेवारीपर्यंत
कुठे- उन्नती गार्डन मैदान, शिवाई नगर, पोखरण रोड नं. १, ठाणे (प.)
चित्रपट रसास्वाद कार्यशाळा
डोंबिवली- चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर त्यामागे खूप सारी मेहनत असते. चित्रपट कसा कसा पाहावा, त्यामागील बारकावे, अभिनय, चित्रीकरण कसे झाले याचा रसास्वाद कसा घ्यावा याविषयीची कार्यशाळा डोंबिवलीत भरणार आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन शनिवार, ९ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता फिल्म सोसायटी चळवळीचे प्रणेते व सिनेअभ्यासक सुधीर नांदगांवकर यांच्या हस्ते होणार असून समारोप रविवार, १० जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता होईल. या वेळी ‘लेसन्स इन फर्गेटिंग’ हा इंग्रजी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष किरण शांताराम व अभिनेते विक्रम गोखले उपस्थित राहणार आहेत. या दोनदिवसीय कार्यशाळेत सुधीर नांदगांवकर, अशोक राणे, अभिजित देशपांडे, संतोष पाठारे, गणेश मतकरी, श्याम क्षीरसागर, अमित चव्हाण आदी दिग्गज कलाकार या कार्यशाळेत चित्रपटांवर व्याख्यान देणार आहेत. तसेच चित्रपटांवर चर्चासत्रही रंगणार आहे.
कधी- ९, १० जानेवारी, वेळ- सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत
कुठे- ऑडिटोरियम, के. वि. पेंढरकर महाविद्यालय, डोंबिवली (पू.)
खाद्यसंस्कृतींचा संगम
सध्याच्या सर्वच गोष्टींमध्ये फ्यूजनचा ट्रेंण्ड आहे. मिश्र जीवनशैलीमध्ये सर्वाधिक प्रयोग हे खाद्यपदार्थामध्ये केले जातात. भारतीय मेजवानी पाश्चिमात्य पद्धतीने शिकण्याची संधी ठाण्यातील कोरम मॉलने महिलांसाठी उपलब्ध करून दिली आहे. कोरम मॉलच्या वुमन्य ऑन वेनस्डे या उपक्रमाअंतर्गत येत्या बुधवारी ‘वेस्ट टेस्ट’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मेक्सिकन उंधीयो, पावभाजी नाचोस्, दाल ढोकली लासजन, वॉमटॉन कचोरी, फ्यूजन कचोरी या पदार्थाच्या मेजवानीचे प्रशिक्षण या वेळी देण्यात येणार आहे
कधी- १३ जानेवारी, वेळ- दुपारी ३ ते रात्री ८
कुठे- कोरम मॉल, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ, ठाणे .
कथ्थक आणि लावणीचा अनोखा मिलाफ
शास्त्रीय नृत्यातील भावमुद्रांचे दर्शन घडवणारे कथ्थक, लोकनृत्यातील दिलखेचक प्रकार असलेली लावणी आणि आजच्या संगीत सुरावटींवर थिरकायला लावणारा ‘कन्टेम्पररी’ नृत्य प्रकार एकाच रंगमंचावर पाहण्याची अभूतपूर्व पर्वणी ठाणेकरांना चालून आली आहे. स्पंदन संस्थेतर्फे नृत्य, संगीत यांचा मिलाप घडवणाऱ्या ‘आवर्तन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेत्री आणि नृत्यांगना अदिती भागवत यांच कथ्थक, लावणी आणि कन्टेम्पररी नृत्याच्या अदा प्रेक्षकांना यानिमित्ताने पहायला मिळणार आहेत.
कधी- शनिवार ९ जानेवारी, वेळ- रात्री ९ वाजता
कुठे- अत्रे रंगमंदिर, कल्याण</strong>
राजस्थानी संस्कृतीच्या सान्निध्यात..
राजस्थानच्या वाळवंटाचे आकर्षण सर्वानाच असते. तेथील पोशाख, त्यांचे राहणीमान, संस्कृती जाणून घेण्यासाठी आता राजस्थानात जाण्याची आवश्यकता नाही. ठाणे येथे आयोजित राजस्थान महोत्सवात राजस्थानची ओळख जाणून घेता येणार आहे. मारवाडीज इन ठाणे वेल्फेअर यांच्या वतीने ९ व १० जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता येथील शिवाजी मैदानात हा महोत्सव भरविण्यात येणार आहे. या महोत्सवात राजस्थानातील रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, दागिने, खाद्यपदार्थासह लोककला, संस्कृती, वैभवशाली ऐतिहासिक ठेव्यांची भव्यदिव्य झळ या ठिकाणी भेट देणाऱ्यांना लाभणार आहे. महोत्सवात दोन्ही दिवस इंद्रधनुषी हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका फेम अभिनेते व ज्येष्ठ विनोदी कवी शैलेश लोढा हे महोत्सवाचे सूत्रसंचालन करणार असून डॉ. विष्णू सक्सेना (अलिगड), संजय झाला (उज्जन), दिनेश दिग्गज (जयपूर), अलका अग्रवाल (मुंबई) आदी हिंदी भाषेतील कवी आपल्या विनोदी कविता सादर करतील. बॉलीवूड अभिनेते सनी अग्रवाल, अभिनेत्री अनन्या दुबे यांच्यासह चित्रपट मालिकांतील अनेक कलावंत या महोत्सवाला आपली हजेरी लावणार आहेत.
कधी- ९ व १० जानेवारी, वेळ- सायंकाळी ६.३०
कुठे- शिवाजी मैदान, तलावपाळीसमोर, जांभळी नाका, ठाणे (प.)
फॅशन शो.. आपला आणि पाळीव प्राण्यांचा!
रोटरी क्लब ऑफ ठाणेच्या वतीने ठाण्यात ‘रोटरी कोपरी फेस्ट २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे, यामध्ये ‘फॅशन शो’सोबत पाळीव प्राण्यांचा ‘हेल्दी पेट शो’ पार पडणार आहे. याशिवाय ‘मास्टर शेफ’ ही पाककृती स्पर्धादेखील या ठिकाणी होईल. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवात असणार आहे. विविध स्पर्धासोबत ज्येष्ठ नागरिकांचा उमंग हा सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सवात सादर होणार आहे. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींच्या माध्यमातून रोबोटिक प्रदर्शन या महोत्सवात पाहायला मिळणार आहे.
कधी- ८ ते १० जानेवारी, वेळ- सकाळी ९ ते १०
कुठे- संत तुकाराम मैदान, अग्निशमन दल केंद्राजवळ, कोपरी, ठाणे (पूर्व)
डोंबिवलीत ‘साल्सा’चा ठेका
नृत्य ही आता फक्त कला उरलेली नाही. रोजच्या तणावातून मुक्त होण्यासाठी म्हणा किंवा ताजेतवाने वाटण्यासाठी नागरिक नृत्य करताना दिसतात. नृत्यातील सालसा प्रकार मोफत शिकण्याची संधी डोंबिवलीकरांना चालून आली आहे. ‘स्टेप एन स्टेप डान्स स्टुडिओ’ आणि ‘वेध अॅक्टिंग अॅकॅडमी’ या संस्थांच्या वतीने ही कार्यशाळा भरविण्यात येणार आहे. वय वर्षे १६ व त्यापुढील गटासाठी शनिवार, ९ जानेवारीला सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी संपर्क : ९७७३४१३६९४ किंवा ९८२०२२५९५४
कधी – ९ जानेवारी, वेळ- सायंकाळी ५ ते ६
कुठे – देवरुखे ब्राह्मण सेवा संघ सभागृह, डोंबिवली (पू.)
‘मॅग्नेटिक मून्स’
स्त्री मॉडेल असलेली चित्रे ‘मॅग्नेटिक मून्स’ या प्रदर्शनात पाहायला मिळतील. हे प्रदर्शन सध्या सुरू असून चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी सहज सुंदरता, सात्त्विकता, तेज यांचा साक्षात्कार या चित्रांतून घडविण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तववाद आणि नैसर्गिकता या अंगाने जाणारी चित्रे आहेत. या चित्रांमधून माजघरात, घरातल्या आतल्या भागात वीणकाम, कलाकुसर, रंगकाम करणाऱ्या तरुणी दिसतात, त्यांच्या हातातील वस्तू, त्यांनी परिधान केलेली वस्त्र प्रावरणे, त्यांचे दागदागिने यातले बारकावे चित्रांतून दाखविले आहेत.
११ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत
जहांगीर कला दालन, काळा घोडा
‘एक शाम पंचमदा के नाम’
राहुल देव बर्मन यांच्या गाण्यांवर आधारित ‘एक शाम पंचमदा के नाम’ हा कार्यक्रम स्वरगंधार या संस्थेतर्फे होत आहे. शैलजा सुब्रमण्यम, सोनाली कर्णिक, आलोक काटदरे आणि आशीष श्रीवास्तव हे गायक यात गाणी सादर करणार असून १६ वादकांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ आहे. ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र रसिकांशी संवाद साधणार असून अविनाश चंद्रचूड यांचे संगीत संयोजनाची आघाडी सांभाळणार आहेत. संपर्क- मंदार कर्णिक: ९८२०७५७४३५.
दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, विलेपार्ले
शनिवार, ९ जानेवारी, रात्री ८.३० वाजता
‘पं. सी. आर. व्यास वंदना’
ज्येष्ठ आणि प्रख्यात गायक पंडित जसराज आणि मोहनवीणाप्रसारक पंडित विश्वमोहन भट्ट, गायक गणपती भट आणि प्रख्यात संतूरवादक पंडित सतीश व्यास हे मान्यवर कलाकार ‘सी आर व्यास वंदना’मध्ये आपली कला सादर करणार आहेत. विख्यात िहदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पंडित सी. आर. व्यास यांच्या १४व्या स्मृतिदिनानिमित्त आणि त्यांनी िहदुस्थानी शास्त्रीय संगीताला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विनामूल्य प्रवेशिकांसाठी संपर्क- ऱ्हिदम हाऊस- ४३२२२७२७ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह- २४४६५८७७.
– ९ व १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता
– स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क
आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शन
विविधरंगी विविध जातींच्या फुलांचे नेत्रसुखद प्रदर्शन पाहणे, अनुभवणे, निसर्गाची किमया याचि देहा याचि डोळा अनुभवण्याची संधी महानगरीय माणसांना फारच कमी वेळा मिळते. म्हणूनच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनी आणि मुंबई रोझ सोसायटी यांनी आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. विविधरंगी गुलाबांव्यतिरिक्त ऑर्किड्स, लिलियम्स, कार्नेशन्स, हेलिकॉनिअस अशा जगभरातील अनेकविध जातींची फुले या प्रदर्शनात पाहायला मिळतील. नागपूर, जबलपूर, कोलकाता इत्यादी शहरांतील फुलांबरोबरच थायलंड, मलेशिया, हॉलंड अशा देशांतील फुलेही पाहायला मिळतील. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेल्या ४ हजार चौरस फूट आकारात उभारण्यात आलेली उभी हरित भिंत पाहायला मिळेल. त्याशिवाय विविध प्रकारचे बोन्साय प्रदर्शनात मांडण्यात येतील.
९ व १० जानेवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत
मियाल कॉलनी, सुबा हॉटेलशेजारी, पी अॅण्ड टी कॉलनीसमोर, सहार मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व.
– शलाका सरफरे