लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : शहरात मराठी नववर्षानिमित्ताने निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाच्या वर्षी कोळी, धनगर, वडार, मातंग, राजस्थानी, अग्रवाल अशा विविध समाजांच्या संस्कृतीचे दर्शन घडणार असल्याचे चिन्हे आहेत. स्वागत यात्रेच्या तयारीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीत विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थिती लावत असून आमचाही या यात्रेत सहभाग असल्याचे ते सांगत आहेत. तसेच काहींनी आमच्या संस्कृतीचा चित्ररथ यात्रेत सहभागी केला जाईल असेही नमूद केले आहे. त्यामुळे यंदाची यात्रा ही वैविध्यतेने नटलेली पाहायला मिळणार आहे.

ठाणे शहरातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्षे स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्षे आहे. त्यामुळे यंदा या यात्रेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. स्वागत यात्रेची तयारी देखील आयोजकांनी चार महिन्याआधीपासून सुरु केली आहे. यंदाची यात्रा भव्य स्वरुपात व्हावी यासाठी आयोजकांकडून विविध संस्था आणि समाजाला यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.

यापूर्वी यात्रेत अवघे काही समाज सहभागी होत होते. परंतू, या यात्रेबाबत होत असलेला प्रचार प्रसार पाहून आता विविध समाज या यात्रेशी जोडले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कोळी, धनगर, वडार, मातंग, राजस्थानी, अग्रवाल, माळी, बंजारा असे विविध समाज यंदाच्या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहे. या समाजाचे प्रतिनिधी हे स्वागत यात्रेच्या बैठकीत येत असून त्यांचा या यात्रेत कशा स्वरुपात सहभाग असणार आहे याची माहिती देतात. काही समाज हे त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ साकारणार आहेत. तर, काही जण त्यांच्या समाजाची वेशभुषा परिधान करुन यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मार्फत देण्यात आली.

यंदाच्या वर्षी उपयात्रा वाढण्याची शक्यता

शहराच्या मुख्य यात्रेत कानाकोपऱ्यातील मंडळींना सहभागी होणे शक्य होत नाही. तसेच ही यात्रा केवळ एका भागा पुरती मर्यादित राहून नये यासाठी गेले काही वर्षांपासून काही भागातील नागरिक आणि संस्था न्यासासोबत जोडून उपयात्रा काढत आहेत. कळवा, ठाणे पूर्व, शिवाईनगर, पोखरण रोड नंबर १, घोडबंदर, वाघबीळ, ढोकाळी आणि लोकमान्य नगर अशा आठ उपयात्रा निघतात. परंतू, यातील काही यात्रांचा मार्ग हा खूप मोठा असल्यामुळे या यात्रांमध्ये दोन तुकड्या पाडण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे. त्यामुळे यंदा उपयात्रा वाढणार असल्याचे चिन्हे आहेत.

Story img Loader