सोसायटय़ांना टँकरने पाणी पुरविण्यासाठी लाखोचा खर्च

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत

देशातील एक महत्त्वाचे महानगर अशी ख्याती असलेले ठाणे पाणीपुरवठय़ाच्या बाबतीत मात्र अजूनही परावलंबी आहे. गेल्या एक तपाहून अधिक काळ स्वतंत्र धरण उभारण्याचे ठाणेकरांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. त्यामुळे निरनिराळ्या प्राधिकरणांकडून पाणी विकत घेऊन सध्या महापालिका प्रशासन शहरवासीयांना पाणीपुरवठा करते. पाण्याचा हा पुरवठाही मागणीपेक्षा कमी असल्याने नव्या ठाण्यातील अनेक सोसायटय़ांना टँकर मागवावा लागतो. त्यासाठी दर महिना लाखो रुपये खर्च होत आहे.

जल व्यवस्थापनाचे हे भीषण वास्तव लक्षात घेऊन अलीकडेच उच्च न्यायालयाने पुरेशी व्यवस्था होईपर्यंत घोडबंदर रोड परिसरातील नवीन ठाण्यात नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे आदेश दिले आहेत. शहरापुढे पाण्याचा इतका भीषण पेचप्रसंग असूनही परंपरागत जलसाठे वापरात आणण्याबाबत महापालिका प्रशासन तसेच नागरिक कमालीचे उदासीन आहेत. तलावांचे शहर अशी ख्याती असलेल्या ठाण्यात विहिरींची संख्याही बरीच असली तरी अनास्था, अतिक्रमण आणि जलनिरक्षरतेमुळे काही अपवाद वगळता बहुतेक ठिकाणचे पाणी वापरलेच जात नसल्याचे दिसून आले आहे. फक्त नौपाडा विभागातच शंभर विहिरी आणि १२ कूपनलिका असल्याची महापालिकेच्या दप्तरी नोंद आहे. शहरातील एक दक्ष नागरिक महेंद्र मोने यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून हे वास्तव उघड झाले आहे. त्यापैकी बहुतेक विहिरीतील पाणी वापरलेच जात नाही. गेले १२ वर्षे रखडलेल्या शंभर किलोमीटर अंतरावरील शहापूर तालुक्यातील प्रस्तावित ‘शाई’ धरणासाठी अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद करणाऱ्या महापालिका प्रशासनाने शहरात असलेले हे जलस्रोत वापरात आणण्याबाबत मात्र फारसा उत्साह दाखवलेला नाही. २००९ नंतर विहिरीतील जलसाठय़ांचे सर्वेक्षणच झालेले नाही. या विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी इतर वापरासाठी त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो, असे जलतज्ज्ञांचे मत आहे.

साधारण हजार वर्षांपूर्वीच्या शिलाहार राजवटीत राजधानीचे ठिकाण असलेल्या ठाणे (श्रीस्थानक) शहराची पाणीव्यवस्था अतिशय उत्तम होती. शहरात सुमारे साठ तलाव होते. त्यापैकी आता फक्त ३६ तलाव उरले आहेत. याशिवाय हजारो विहिरी होत्या. आताही ठाणे पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी ४२८ विहिरी आहेत. मात्र नळ पुरवठा सुरू झाल्यानंतर विहिरीतील पाण्याकडे दुर्लक्ष झाले. जागेच्या किमती वाढल्यानंतर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या विहिरी बुजविण्यात आल्या. सांडपाण्याचे स्रोत सोडल्याने तसेच कचरा टाकल्याने काही विहिरींचे पाणी दूषित झाल्याचे इतिहासतज्ज्ञ सदाशिव टेटविलकर यांनी सांगितले.

शहरांमधील विहिरींचा जलसाठा पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरता येऊ शकेल. या विहिरी ज्या ठिकाणी आहेत, त्याच्या आजूबाजूच्या इमारतींना हे पाणी वापरण्याबाबत सक्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा आणि मागणी यामध्ये सध्या जी तूट आहे, ती कमी होऊ  शकेल. विहिरींमधील गाळ काढला, त्या स्वच्छ केल्या. त्यात सांडपाणी सोडणे बंद केले तर त्यातील पाण्याचा दर्जा सुधारू शकतो. काही ठिकाणी जुजबी शुद्धीकरण यंत्रणाही बसवता येऊ शकते.

हेमंत जगताप, जलतज्ज्ञ, रोटरी समूह 

गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे जलसंकट ओढवले असताना झोपडपट्टी विभागातील विहिरींचे पाणी वापरात आणले होते. सध्या महापालिका क्षेत्रातील सर्वच विहिरींचे प्रशासन नव्याने सर्वेक्षण करीत असून त्यातून पर्यायी पाणीपुरवठा करण्याबाबत विचार करीत आहे.

रवींद्र खडताळे, उपनगर अभियंता, ठाणे पालिका