दांडियाच्या रिंगणात सालसा, बेली डान्स, हिपहॉप आणि झुम्बा

तरुणाईसह आबालवृद्धांना ठेका धरायला लावणारा नवरात्रोत्सव आता अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपला असताना गरबा आणि दांडिया नृत्याचे प्रशिक्षण आणि सराव वर्ग नृत्येच्छुकांनी भरून गेले आहेत. गेल्या काही वर्षांत पारंपरिक गरबा प्रकाराला हिंदी सिनेसंगीताची जोड दिली जात असताना, यंदाच्या वर्षी चक्क गरबा नृत्यामध्ये पाश्चिमात्य नृत्यशैलीची सरमिसळ केली जाऊ लागली आहे. गरब्याचा ठेका धरताना त्या तालावर सालसा, बेली डान्स, हिपहॉप आणि झुम्बा नृत्य करण्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू झाले आहेत.

गरबा हा पारंपरिक नृत्यप्रकार असला तरी गेल्या काही वर्षांत त्यातील संगीत तसेच नृत्यशैलीला आधुनिक बाज आला आहे. नवरात्रोत्सवात अनेक मंडळांच्या ठिकाणी हिंदी चित्रपटगीतांच्या तालावर गरबा किंवा दांडिया करण्यात येत असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी उत्कृष्ट नृत्य करणाऱ्यांना दररोज आणि साप्ताहिक बक्षिसेही दिली जात असतात. त्यामुळे आपली वेशभूषा आकर्षक करण्यासोबतच नृत्याच्या सरावावरही आता तरुणवर्ग भर देऊ लागला आहे. गेल्या महिनाभरापासून ठाण्यातील विविध नृत्यसंस्थांमध्ये गरबा नृत्य शिकण्यासाठी वा सराव करण्यासाठी तरुण-तरुणींची गर्दी झाल्याचे दिसून येत आहेत. काही हौशी नृत्यप्रेमी केवळ पारंपरिक गरबा शिकण्यासाठी कार्यशाळेमध्ये प्रवेश घेतात, तर काही स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेत असल्याची माहिती सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका दीप्ती वोरा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

यंदा गरब्याच्या तालावर पाश्चिमात्य नृत्य करण्याकडेही तरुणाईचा कल वाढत आहे. अनेक ठिकाणी गरबा संगीतावर बेली डान्स, हिपहॉप, झुम्बा आणि सालसाच्या ‘स्टेप्स’ तयार केल्या जात असून याचा कसून सरावही करण्यात येत आहे. ‘पारंपरिक वाद्यांच्या तालावर खेळला जाणारा गरबा आता पाश्चिमात्य नृत्यशैलीमध्ये साकारण्याचे कौशल्य अवगत झाल्याने या खेळाला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. यंदा सालसाच्या ठेक्यावर जोडीने दांडिया रास खेळला जाणार आहे,’ असे दीप्ती वोरा यांनी सांगितले.

Story img Loader