ठाणे : पश्चिम रेल्वे स्थानक परिसर फेरिवालामुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून त्यासाठी सकाळ आणि सायंकाळ अशा गर्दीच्या वेळेत या परिसरात अतिक्रमण विरोधी पथके तैनात करण्याचे नियोजन आखण्यात येत आहे. त्यात या भागात अतिक्रमण कारवाईच्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांच्या कामाच्या वेळा निश्चित करून याठिकाणी पोलिसांचा फौजफाटाही कसा तैनात राहील, याचाही विचार करण्यात येत आहे. नव्या नियोजनाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याने स्थानक परिसर फेरिवालामुक्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातून दररोज सात लाखाहून अधिक प्रवाशी प्रवास करतात. या प्रवाशांना स्थानकातून प्रवास करताना रस्ते आणि पदपथ अडविणाऱ्या फेरिवाल्यांचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना फेरिवाल्यांना पदपथ आणि रस्त्यावरून बाजूला होण्यास सांगितले तर, काही फेरिवाले त्या नागरिकांना दमदाटी करतात. रेल्वे स्थानकाजवळील १५० मीटरचा परिसर फेरिवालामुक्त जाहीर करण्यात आलेला असला तरी या नियमाचे उल्लंघन होताना दिसून येते. स्थानकाच्या प्रवेशद्वारापासूनच फेरिवाले ठाण मांडून बसत असल्याचे दिसून येते.
पालिका अतिक्रमण विरोधी पथकाचे वाहन येत असल्याची माहिती मिळताच फेरिवाले तेथून गायब होतात आणि पथक माघारी फिरताच फेरिवाले पुन्हा येऊन ठाण मांडून बसतात. त्यामुळे प्रवाशांना येथून चालणे शक्य होत नाही. हा परिसर फेरिवालामुक्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा परिसर फेरिवालामुक्त करण्यासाठी पाऊले उचलली असून त्यासाठी नवे नियोजन आखले जात आहे.
हेही वाचा >>> ठाकरे गटाला धक्का, कल्याण मध्ये ठाकरे समर्थक शिंदे गटात सामील
असे असेल नवे नियोजन
ठाणे पश्चिम स्थानक परिसरात सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत नागरिकांची मोठी वर्दळ असते. या वेळेत हा परिसर फेरिवालामुक्त रहावा आणि नागरिकांना चालण्यासाठी रस्ते व पदपथ मोकळे रहावेत, या दृष्टीकोनातून नवे नियोजन आखले जात आहे. या परिसरात गर्दीच्या वेळेत अतिक्रमण विरोधी पथके तैनात केली जाणार असून या पथकांना त्यांच्या कामाच्या वेळा ठरवून दिल्या जाणार आहेत. याशिवाय, या भागात अतिक्रमणची कारवाई करताना पोलीसांच्या कामाच्या वेळा निश्चित केल्या जाणार आहेत. त्यामुळे नेमून दिलेल्या पथकांवर हा परिसर फेरिवालामुक्त ठेवण्याची जबाबदारी असणार आहे.
ठाणे पश्चिम रेल्वे परिसर फेरिवालामुक्त करण्यासाठी पालिकेची पथके तैनात करण्यात येणार असून तसे नियोजन आखण्याचे काम सुरु आहे. त्यात पालिका पथकांच्या तसेच कारवाईसाठी नेमलेल्या पोलिसांच्या कामाच्या वेळा निश्चित करण्यात येणार असून या पथकांमार्फत रस्ते आणि पदपथ अडविणाऱ्या फेरिवाल्यांवर कारवाई केली जाणार आहे.