ठाणे : देशातील विरोधक गेल्या ७० वर्षांत राम मंदिर बांधू शकले नाहीत. या मंदिरासाठी आपल्याला पाचशे वर्ष वाट पहावी लागली. हे मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्म घ्यावा लागला आणि आज हे मंदिर होत आहे, असे विधान मुख्यमंत्री पुत्र व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केले.
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रविवारी सायंकाळी महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष (आठवले), पीआरपी, बविआ, जेएसएस, आरएसपी, पीजेपी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, ब. रि. एकता मंच, रिपब्लिकन पक्ष (खरात), शिवसंग्राम आदी १५ पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची स्तुती केली.
हेही वाचा – दिवा पाणीटंचाईला जबाबदार असणाऱ्या शिंदे गटाला पाण्यात बुडवा – उद्धव ठाकरे
विरोधक म्हणतात की, देशात राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. पण, गेल्या ७० वर्षांत त्यांना मंदिर बांधायला कुणी थांबविले होते. हे गेल्या ७० वर्षांत मंदिर बांधू शकले नाहीत. या मंदिरासाठी आपल्याला पाचशे वर्षे वाट पहावी लागली. हे मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्म घ्यावा लागला आणि आज हे मंदिर होत आहे, असे खासदार शिंदे म्हणाले. देशाच्या इतिहासात गेल्या ५० वर्षांत जे काम झाले नाही, ते काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत करून दाखवले आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी देशाला पुढे नेण्याचे काम केले आणि अनेक प्रकल्प उभारण्याचे कामही त्यांनी केले. विरोधकांना आठवलं नाही की स्वच्छ अभियानाच्या माध्यमातून घराघरात शौचालय उभारायला हवी. ते काम मोदींनी केले. तसेच उज्जवला गॅस योजनेच्या माध्यमातून घराघरांमध्ये गॅस पोहोचवण्याचे काम मोदींनी केले, असेही ते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणूक देशासाठी आणि देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्वाची आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये आपण जितक्या जागा जिंकल्या, त्यापेक्षा जास्त जागा यंदा जिंकायच्या आहेत. त्यासाठी ‘जय श्री राम’ या घोषणेबरोबरच ‘अब की बार ४०० पार’ ही घोषणा द्यायची आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी राज्यात ‘अब की बार ४५ पार’ अशी घोषणा आजपासून द्यावी लागेल, असेही ते म्हणाले. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करतात आणि राज्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे काम करीत आहेत. हे सर्वजण पायाला भिंगरी लावून राज्यात विकासाचे राजकारण करत आहेत, हे लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम आपल्याला करावे लागेल, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या.