लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
Mira Road Crime : मनोज सानेने त्याची पत्नी सरस्वती वैद्यची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी काय काय केलं? याचे धक्कादायक खुलासे पोलीस तपासात समोर आले आहेत. सरस्वतीला ठार केल्यानंतर मनोज तिच्या मृतदेहाची विल्हेवाट चार दिवस लावत होता. त्याने तिच्या मृतदेहाचे फोटोही काढल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली?
मनोज सानेने सरस्वती वैद्यची हत्या केली. त्यानंतर मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाची छायाचित्रे काढली होती. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची? यासाठी त्याने गुगलवर माहिती सर्च केली होती. सरस्वतीची हत्या केल्यानंतर मनोजने तिच्या मोबाईलमधला सगळा मजकूर मनोजने डिलिट केला असंही पोलिसांनी सांगितलं.
मनोजने आणखी काय केलं?
लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केल्यानंतर मनोजने तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी इलेक्ट्रीक कटर विकत आणलं. तसंच मृतदेहाला दुर्गंधी येऊ नये म्हणून काय काय करता येईल ते उपाय गुगलवर शोधले होते. हत्येनंतरचे पुढचे चार दिवस मनोज साने सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत होता. सध्या मनोज चौकशीच्या दरम्यान पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देतो आहे. कधी आपल्याला दुर्धर आजार असल्याचं तो सांगतो आहे. तसंच त्या दुर्धर आजारामुळे सरस्वती आणि माझ्यात शरीर संबंध प्रस्थापित होत नव्हते असंही सांगतो आहे. तर कधी आपण नपुंसक झालो आहोत असंही तो पोलिसांना सांगतो आहे. मात्र मनोज साने हा बाहेरख्याली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सरस्वतीच्या तीन बहिणी पोलीस ठाण्यात आल्या
पहिल्या दिवसापासून मनोज साने पोलिसांना दिशाभूल करणारी खोटी माहिती देत होता सरस्वती अनाथ आहे तिला कोणीही नातेवाईक नाही असे त्याने पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांना सरस्वतीचं आधार कार्ड मिळालं आहे. त्यावरुनच पोलिसांना तिच्या तीन बहिणींचाही शोध लागला. या तीन बहिणी पोलीस ठाण्यात हजर झाल्या होत्या. बहिणींना बातम्यांमधून सरस्वतीची हत्या झाल्याची माहिती मिळाली होती. सरस्वतीच्या बहिणी मुंबई परिसरात राहतात पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत.
कर्जबाजारी झाला होता मनोज साने
मनोज साने बोरिवलीतल्या एका शिधावाटप दुकानात अर्धवेळ काम करत होता. तिथे त्याला पाच हजार रुपये पगार मिळत होता. बोरिवली येथील घराचे त्याला ३५ हजार रुपयांचे घर भाडे मिळत होते.मात्र तो कर्जबाजारी झाला होता सोसायटीचे थकीत मेंटेनन्स भरण्यासाठी त्याने कर्जही काढले होते.