कल्याण-डोंबिवली शहरांमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्यांची संख्या तेवढीच, आकारही फार विस्तारत नाही आणि वाहने मात्र दसपटीने वाढू लागली आहेत. नवे रस्ते, उड्डाणपूल प्रस्तावित करावेत या दृष्टीने महापालिका, सत्ताधाऱ्यांकडून वर्षांनुवर्षे ठोस पावले उचलली गेली नाहीत. उलट आपल्या आजूबाजूला असलेली सरकारी, सार्वजनिक मालकीची जागा कशी हडप करता येईल, याकडेच बहुतेकांना ओढा होता. ही वाढीव बांधकामे वाहतूक कोंडीला हातभार लावू लागली आहेत. जोपर्यंत रस्त्याच्या कडेला झालेली ही बेकायदेशीर बांधकामे पाडली जात नाहीत तोपर्यंत कल्याण-डोंबिवली शहरांना वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळणे कठीणच दिसते.
कल्याण-डोंबिवली शहरांच्या १४४ चौरस किलोमीटर परिक्षेत्रात ३६० किलोमीटर क्षेत्राचे रस्ते बांधण्यात आले आहेत. गेल्या २० वर्षांत या रस्त्यांमध्ये फारशी वाढ करणे येथील अभियांत्रिकी विभागाला जमलेले नाही. याचा अर्थ एव्हढाच की रस्ते आहे तेवढेच राहिले वाहने मात्र वाढली. कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात सुमारे साडेपाच लाख वाहनांची नोंदणी आहे. त्यामधील सुमारे दोन ते तीन लाख वाहने दररोज कल्याण- डोंबिवली शहर परिसरात येजा करीत असतात. हा सगळा भार उपलब्ध रस्त्यांवर येत आहे. त्यातून वाहतूक कोंडीसारखा प्रश्न अधिक गंभीर होऊ लागला आहे. ही कोंडी सोडविण्याच्या फुकाच्या वल्गना गेल्या काही वर्षांपासून केल्या जात आहेत. सत्ताधारी आणि प्रशासन अशा दोन्ही आघाडय़ांवर या घोषणा प्रत्यक्षात उतरू शकलेल्या नाहीत.
दहा वर्षांपूर्वी महापालिकेने कल्याण रेल्वे स्थानक, शिवाजी चौक या वर्दळींच्या रस्त्यांखाली भुयारी मार्ग करता येईल का, याचा विचार बोलून दाखविला होता. अलीकडे शहरातील प्रत्येक चौक, रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. पर्यायी मार्ग झाले असते तर हे सापळे तयार झाले नसते. शिवाजी चौकात दररोज सर्वसामान्य कसा जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतात. एक ते दीड किलोमीटर अंतराचा कल्याणमधील गोविंदवाडी बाह्य़ वळण रस्ता महापालिकेला गेल्या सहा वर्षांत मार्गी लावता आलेला नाही. या रस्त्याचे काम पूर्ण झाले असते तर आज कल्याण शहरातील पत्रीपूल शिवाजी चौकमार्गे दुर्गाडी किल्ला ही जी वाहतूक सुरू आहे ती कल्याण शहराबाहेरून नेता आली असती. कल्याणमध्ये जो हल्ली वाहतुकीचा गजबजाट सुरू आहे तो कितीतरी प्रमाणात कमी झाला असता. राजकीय इच्छाशक्ती बथ्थड असेल तर एखाद्या विकास कामाचा कसा चोळामोळा होतो हे पाहायचे असेल तर गोविंदवाडी वळण रस्ता हे उत्तम उदाहरण ठरावे. कल्याण शिळफाटा रस्त्याच्या पुर्नपृष्ठीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदारांच्या (राजकीय आशीर्वाद असलेल्या) गळ्यात घालण्यासाठी महापालिकेने घाईने या रस्ते कामाला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले. त्या बदल्यात गोविंदवाडी बाह्य़वळण रस्ता ‘एमएसआरडीसी’ने करून द्यावा असे ठरले. शिळफाटा रस्त्याचे काम पूर्ण होऊन या रस्त्यावरील वसुलीही ठेकेदाराने केली. पण गोविंदवाडी वळण रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाला पूर्ण करता आला नाही. हा रस्ता मार्गी लावावा म्हणून आक्रमक पवित्रा घ्यावा, असे कधी सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांना वाटले नाही. निवडणुकीच्या तोंडावर देखावे उभे करण्यासाठी याप्रकरणी आंदोलने करण्यात आली. कल्याणमधील वाहतुकीतील ही मोठी खिंडी जोपर्यंत मोकळी होत नाही, तोपर्यंत शेकडोंच्या संख्येने वाहतूक पोलीस तैनात केले तरी मूळ प्रश्न सुटणारा नाही.
कल्याणमधील वाहतूक कोंडीचे आणखी एक दुखणे म्हणजे कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानक भागातील साधना, महालक्ष्मी, गुरुदेव हॉटेलांसमोर उभ्या असलेल्या बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा. सहा आसनी रिक्षांना शहरात प्रवेशबंदी असताना या रिक्षा वाहतूक पोलिसांसमोरून पत्रीपुलाकडून दररोज शहरात प्रवेश करतात. बाजारपेठ पोलीस चौकीजवळील चौकात या रिक्षा वळण घेत असताना वाहतूक पोलीस सकाळच्या वेळेत ज्या पद्धतीने टमटम रिक्षा, ओमनी वाहनांच्या चालकांशी मूठ आवळून ‘हस्तालोंदन’ करतात हे दृश्य कल्याणकरांच्या अंगवळणी पडले आहे. अगोदर बेकायदा वाहने शहरात प्रवेश करून द्यायची आणि नंतर प्रवाशांनी वाहतूक कोंडी होते अशी ओरड केली की पळत सुटायचे अशी वाहतूक विभागाच्या कामकाजाची पद्धत झाली आहे. वर्दळीच्या शिवाजी चौकात रस्ता अडवून भिवंडीकडे जाणारे रिक्षाचालक व्यवसाय करीत असतात. त्यांच्यावर कारवाई करणे सहजशक्य आहे. ती कारवाई पोलिसांकडून होत नाही. शिवाजी चौकातील सीतला माता मंदिर आणि हनुमान मंदिराच्या गल्लीतून अनेक वाहने शिवाजी चौकातून या गल्लीतून झुंझारराव बाजारात शिरतात. बाजारातील वाहने या गल्लीतून शिवाजी चौकात येतात. ही घुसखोर दुचाकी वाहने झुंझारराव बाजारात अनावश्यक वाहतूक कोंडी करतात. बाजारात अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे कोंडीत अधिक भर पडते.
कल्याण पूर्व भागात तिसगाव, चक्कीनाका, सूचकनाका, कोळसेवाडी, काटेमानिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर, पदपथांवर उभारण्यात आलेल्या टपऱ्या अनेक वेळा वाहतुकीला अडथळा ठरतात. काही राजकीय मंडळीची ही दुकाने महापालिकेने जमीनदोस्त केली तर कल्याण पूर्व भागातील वाहतूक सुरळीत होईल. टाटा नाका ते गोळवली दरम्यान शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा दररोज बाजार भरतो. महापालिकेने या बाजारावर कारवाई केली होती. परंतु, तो देखावाच ठरला. बाजार नियमित भरण्याचे थांबलेले नाही. कल्याण शिळफाटा रस्ता वाहतूक कोंडी रस्ता म्हणून अलीकडे ओळखला जातो. कल्याण शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा पत्रीपूल ते शिळफाटा दरम्यान बेसुमार टपऱ्या, गाळे, बेकायदा इमारती उभारण्याचा उद्योग सुरू आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटई ते शिळफाटापर्यंत हॉटेल्स, शोभेच्या वस्तू, हेल्मेट, गादी, कपडे विक्रेत्यांची दुकाने अशी सकाळपासून बाजारपेठ भरलेली असते. लोकलच्या गर्दीला कंटाळलेला बहुतांशी प्रवासी हल्ली गट करून भाडय़ाच्या टॅक्सीने मुंबई, नवी मुंबईत जाणे पसंत करीत आहे. नोकरीच्या ठिकाणी दुचाकीने जाणे अनेक जण पसंत करीत आहेत. त्यामुळे शिळफाटा रस्त्यांवरील वाहनांचा भार वाढला आहे.
या रस्त्याचे नियंत्रक असलेल्या एमआयडीसी, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, पालिका आयुक्त यांनी आपल्या हद्दी ओळखून या रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे आवश्यक आहे. काटई नाका ते नवीन पेट्रोल पंपाच्या (शिळफाटय़ाकडून येताना डाव्या बाजूला) दरम्यान रस्त्याच्या किनारी ताडपत्र्या लावून सुरू असलेली व्यापारी गाळ्यांची बेकायदा बांधकामे, इमारतींची बांधकामे शिळफाटा रस्त्याला आक्रसण्याची कामे करीत आहेत. हे प्रशासकीय यंत्रणांनी वेळीच ओळखले नाही तर, येणाऱ्या काळात या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविताना वाहतूक विभागाची दमछाक होणार आहे. डोंबिवली पूर्व भागातील वाहतूक कोंडी हा नेहमीच चर्चेचा विषय झाला आहे. पूर्व भागातून पश्चिमेकडे जाण्यासाठी एकमेव कोपरउड्डाण पूल आहे. या पुलावर गडबड झाली की, पूर्व आणि पश्चिम भाग वाहतूक कोंडीत अडकतो. या पुलाला पर्याय म्हणून ठाकुर्ली येथील रेल्वे फाटक आहे. रेल्वे फाटक अनेक वेळा अर्धा तास उघडले जात नाही, अशी वाहन चालकांची खंत आहे. डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, पालिकेचे मुख्य प्रवेशद्वार या भागात रिक्षा चालकांनी अनधिकृत वाहनतळ गेल्या दोन वर्षांपासून सुरू केली आहेत. ही बेकायदा वाहनतळ पूर्व भागातील वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. दोन दिवसांपूर्वी डोंबिवली वाहतूक विभागाने आक्रमकपणे कारवाई करून इंदिरा चौक भागातील सर्व बेकायदा रिक्षा, टॅक्सी वाहनतळ हटवले. त्यामुळे हा चौक परिसर मोकळा झाला होता. मात्र, अशी कारवाई सातत्याने झाली पाहिजे.
शिळफाटय़ावरून मानपाडा रस्त्याने शहरात प्रवेश करताना सागावमधील हनुमान मंदिर ते निवारा बंगला (गांधीनगर नाला) भागात रस्त्याच्या कडेला भव्य दुकाने, कडेला टपऱ्या, खरेदीदारांची वाहने उभी असतात. त्यामुळे हा रस्ता सकाळ, संध्याकाळ गजबजलेला असतो. या भागावर पालिकेचे नियंत्रण आहे. पालिका अधिकारी आणि भूमाफियांच्या संगनमताने या भागातही बेकायदा बांधकामे उभी राहात आहेत. या भागातील दररोजच्या कोंडीत अडकायला नको म्हणून अनेक वाहनचालक घरडा सर्कलकडून शहरात प्रवेश करतात. त्यामुळे घरडा सर्कल ते टिळक चौक रस्त्यावर वाहनांचा भार येतो. कल्याण-डोंबिवली शहरात कंपन्यांच्या कामगार वाहू बसेस, शाळेच्या बस, केडीएमटी, पर्यटन सेवेतील बसची वर्दळ असते. याशिवाय परवाने नसलेले अनेक रिक्षाचालक बेमालूमपणे शहरात रिक्षा व्यवसाय करतात. उपप्रादेशिक परिवहन विभागाने केवळ कार्यालयीन प्रशासकीय कामकाजात अडकून न पडता आठवडय़ातून किमान एकदा कल्याण, डोंबिवली परिसरातील रिक्षा चालकांचे कागदपत्र, गणवेश याची पडताळणी करणे आवश्यक आहे. ही कारवाई सुरू राहिली तर प्रामाणिकपणे रिक्षा चालकांना व्यवसाय करणे शक्य होईल आणि घुसखोर बेकायदा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना लपून बसण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.