काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा प्रश्न

साडेचार वर्षांपूर्वी मोठय़ा आणाभाका घेत कल्याण, डोंबिवली शहरांचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. ते गेले कोठे? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी कल्याण येथे केला. भाजप-शिवसेनेचे नेते लोकांशी खोटे बोलून बाहेरून कीर्तन आतून तमाशा करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा कल्याण येथे आली होती. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मागील साडे चार वर्षांत लोकांशी खोटे बोलून, खोटी आश्वासने भाजप-शिवसेना सरकारने दिली. आता निवडणुका आल्याने पुन्हा ‘चुनावी जुमले’ जोरात सुरू झाले आहेत. आपला लढा केंद्रातील सरकारविरोधी आहे. आता परिवर्तन घडविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांला मेहनत घ्यावी लागेल. प्रियंका गांधी राजकारणात आल्या आहेत. सरकारच्या कारभाराला जनता कंटाळलेली आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

सामान्य माणूस सरकारच्या कारभाराला सर्वाधिक कंटाळलेला आहे. सामान्य माणसाच्या आवाजाला बळ देण्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज आहे. महसुली तूट वाढली आहे. व्यापार ५० टक्क्यांवर आला आहे. सनातनची पाठराखण करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.

केंद्र, राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. घोषणांव्यतिरिक्त सामान्य, मध्यमवर्गीय, नोकरदार, बेरोजगार यांच्या हातात काहीही पडले नाही. त्यामुळे भाजप-शिवसेनेचे सरकार उलथवण्याची वेळ आली आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी सांगितले. भाजपचे कार्यकर्ते माजी आमदार रमेश पाटील यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला.

Story img Loader