महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये घेतलेल्या मशीदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे पक्षालाच फटका बसण्याची चिन्हं दिसत आहेत. पुण्यामधील मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कल्याणमधील मुस्लीम मनसे कार्यकर्त्यांनाही समाजाने मनसेला मतदान करुनही पक्षाने अशी भूमिका का घेतली हे कळत नसल्याचं म्हटलं आहे. मनसे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी थेट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करताना समाजातील लोक आम्हाला जाब विचारत असल्याचं म्हटलंय.
नक्की वाचा >> पुण्यातील मनसे शहराध्यक्षांचा राज यांना घरचा आहेर; भोंगे लावण्यास नकार देत म्हणाले, “राजसाहेबांचं भाषण कळलंच नाही, आम्ही…”
इरफान शेख यांनी सोशल मीडियावरुन राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खेद व्यक्त केलाय. राज ठाकरे यांनी मशिदी आणि मदरशावर धाडी टाका आणि मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा आम्ही मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावू असे वक्तव्य केले होते. यानंतर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर कल्णयामधील मनसेचे प्रदेश सचिव असणाऱ्या इरफान शेख यांनी, “आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या,आज समाजाला सामोरे जाताना जाणीव झाली. १६ वर्षांचा फ्लॅशबॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं….” अशी भावनिक पोस्ट केली आहे.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: सुप्रिया सुळेंनी करुन दिली २१०० कोटींच्या प्रकरणाची आठवण तर अजित पवार म्हणाले, “राज ठाकरे पलटी मारणारा…”
“मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात भाषणामध्ये जे वक्तव्य केलंय ज्यामध्ये त्यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबरोबर मदरशांबद्दल वक्तव्य केलं आहे. मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर समोर हनुमान चालीसाचं पठण केलं जाईल असं ते म्हणाले. यावरुन मुस्लीम समाजामध्ये नाराजी आहे. मुस्लीम समाजातील मनसे पदाधिकाऱ्यांना मुस्लीम लोक जाब विचारत आहे की पक्षानी ही भूमिका का घेतली,” असं इरफान शेख म्हणाले.
“मुस्लीम समाजाने २००९ मध्ये प्रकाश भोईर आमदार असताना भरघोस मतदान केलं होतं. आता राजू पाटील आमदार झाले त्यांना सात हजार मतं मुस्लीम पट्ट्यातून मिळालेली आहेत. ही मतं ज्यांनी दिली ते आज आम्हाला जाब विचारत आहेत. की ही पक्षाची भूमिका अशी का?,” असंही आकडेवारीचा संदर्भ देत इरफान शेख यांनी म्हटलंय.
नक्की वाचा >> “भोंगे काढा बोलल्यानंतर दंगल व्हावी अशी काय परिस्थिती आलीय? दंगल वगैरे सगळ्या राष्ट्रवादीला…”; मनसेचा हल्लाबोल
यासंदर्भात आम्ही दोन दिवसांमध्ये पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेणार आहोत असंही इरफान शेख यांनी सांगितलंय.