ठाणे : ३० जूनपर्यंत देशात लागू असलेल्या भारतीय दंड संहितेमध्ये प्राण्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्यास कलम ३७७ अंतर्गत कारवाई केली जात असे. मात्र १ जुलैपासून नवे फौजदारी कायदे देशभरात लागू झाल्यानंतर न्याय संहितेमध्ये यासाठी कोणत्याच कलमाचा समावेश नाही. यावर प्राणीप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ऑनलाईन स्वाक्षरी मोहीमही सुरू केली आहे.
ठाण्यात एका श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर यासंदर्भात कोणतेच कलम नसल्याचे उघडकीस आले आहे. समतानगर भागात बँकेबाहेर असलेल्या एका भटक्या मादी श्वानाबाबत २७ जून रोजी अनैसर्गिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. ‘कॅप’ या प्राणीमित्र संघटनेचे कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा संघटनेचा आरोप आहे. ठाण्यातील घटना नवे कायदे लागू होण्यापूर्वी घडल्याने जुन्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचीही मागणी ‘कॅप’चे संस्थापक सुशांक तोमर यांनी केली. तर या प्रकरणाची पडताळणी करून नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा >>>चंपई सोरेन यांचा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन तिसऱ्यांदा राज्याची सूत्रं हाती घेणार
प्राणीप्रेमींचा दावा
● पूर्वीच्या भारतीय दंड संहितेत कलम ३७७नुसार पुरुष, स्त्री आणि प्राण्यांशी अनैसर्गिक संबंध ठेवल्यास आजीवन किंवा १० वर्षांपर्यंत वाढू शकेल अशा कोणत्याही कारावासाची शिक्षा होती.
● नव्या भारतीय न्याय संहितेत प्राण्यांविषयी अनैसर्गिक अत्याचाराचे कलम नसल्याचा दावा प्राणीप्रेमी संघटनांनी केला आहे.
१ तारखेपासून लागू झालेल्या नव्या फौजदारी कायद्यांमध्ये प्राण्यांवर अनैसर्गिक अत्याचारांसाठी कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करायाचा, याबाबत स्पष्टता नाही.
आम्ही केंद्रीय गृहमंत्रायलाच्या संसदीय स्थायी समितीला सूचना आणि हरकतीद्वारे प्राण्यांवरील अत्याचाराची बाब निदर्शनास आणून दिली होती. समितीने सूचनांना संमती देऊन त्या गृहमंत्रालयाकडे पाठविल्या. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. आता आम्ही याबाबत ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.-मीत आशर, ‘पेटा’चे कायदेविषयक सल्लागार