पांढऱ्या वाटाण्याला हिरवा रंग देऊन विक्री
मुंबई, ठाण्याच्या घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा हिरवा वाटाणा किलोमागे १०० ते १५० रुपयांना विकला जात असताना मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर सोललेल्या हिरव्या वाटाण्याची पाव किलोची पाकिटे जेमतेम दहा रुपयांना विकली जात आहेत. परंतु ही बाजारात आलेली स्वस्ताई नसून हिरव्या वाटाण्याच्या नावाखाली सुरू असलेली भेसळ असल्याचे उघड होत आहे. हा वाटाणा भाजी करण्यापूर्वी गरम पाण्यात उकळताच त्यातून हिरवा रंग निघत असून प्रत्यक्षात तो पांढरा वाटाणा असल्याचे उघड झाले आहे.
चलनकल्लोळाच्या हंगामातही गेल्या पंधरवडय़ापासून भाज्यांच्या स्वस्ताईचा दिलासा सर्वसामान्यांना मिळत असला तरी अनेकांच्या आवडीचा असलेला वाटाणा मात्र अजूनही शंभरीच्या पलीकडे आहे. साधारपणे डिसेंबर महिन्याच्या काळात वाटाण्याचा हंगाम सुरू असतो. त्यामुळे ऑक्टोबरच्या सरी ओसरताच वाटाणा महागतो, असे साधारण चित्र असते. यंदाही वाशीच्या घाऊक बाजारात उत्तम प्रतिचा वाटाणा किलोमागे १२५ ते १५० रुपयांनी विकला जात आहे. घाऊक बाजारातील या चढय़ा दरांमुळे किरकोळीच्या बाजारातही वाटाण्याचे दर चढेच आहेत. असे असताना मध्य रेल्वे स्थानकालगत काही विक्रेते कडधान्यातील पांढरा वाटाणा ‘हिरवा’ करून स्वस्त दरात विकू लागल्याने ग्राहकांची फसगत होऊ लागली आहे.
कल्याण पूर्व येथे राहणाऱ्या प्रियांका कदम यांनी दोन दिवसांपूर्वी स्टेशन भागातून हिरव्या वाटाण्याची काही पाकिटे विकत घेतली. वाटाणे उकडल्यानंतर त्याचा हिरवा रंग पाण्यात मिसळला व वाटाणे पांढरे दिसू लागले. त्यामुळे हा भेसळीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदविली आहे.
‘अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार भाजीपाल्यात किंवा डाळीजन्य पदार्थात अखाद्य किंवा खाद्य रंगांचा वापर करणे गुन्हा आहे. यावरून संबंधितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करता येईल,’ असे अन्न व औषध प्रशासन, कल्याण विभागाचे साहाय्यक आयुक्त सी. डी. राठोड यांनी सांगितले.
अशी होते भेसळ..
५० रुपये किलो दराने उपलब्ध असलेल्या पांढऱ्या वाटाण्याला भिजवून ठेवले जाते. वाटाण्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजत ठेवले जाते. त्यानंतर अखाद्य किंवा खाद्य (रासायनिक) रंगाचा वापर करीत त्याला हिरवा रंग दिला जातो. त्यामुळे वाटाणा मऊ होऊन ताजा व टवटवीत दिसतो. हा वाटाणा मग पाकीटबंद केला जातो. सुमारे २५० ते ३०० ग्रॅम वजनाची ही पाकिटे मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरील फेरीवाले अतिशय कमी दरात विकत आहेत.
हल्ली सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थामध्ये मोठय़ा प्रमाणावर रासायनिक रंगांचा वापर होतो. रासायनिक रंगांचा वापर केलेला भाजीपाला (वाटाणा) लहान मुलांच्या किंवा वृद्धांच्या खाण्यात आल्यास पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे योग्य त्या विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करावी.
– राजीव चौबे, डॉक्टर