गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याकडे दुर्लक्ष; अपघातांना आमंत्रण

ऋषीकेश मुळे, ठाणे

वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी रस्ता बांधतानाच दुभाजक, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक दर्शवणे त्यासाठी पांढरे पट्टे रंगवणे आवश्यक असते. तो पुसट झाल्यानंतर पुन्हा रंगवले जाणेही गरजेचे असते, मात्र ठाण्यातील बहुतेक रस्त्यांवरील ही नियमदर्शक चिन्हे पुसट झाली आहेत. जिथे या चिन्हांसह सिग्नल आणि वाहतूक पोलीस आहेत, तिथेही नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळत आहे.

ठाणे शहरातील बहुतेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले असले, तरी तिथे झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधकांवर पांढरे पट्टे रंगवलेले नाहीत. काही ठिकाणी हे पट्टे रंगवण्यात आले असले, तरी सततच्या वाहतुकीमुळे ते पुसट झाले आहेत. हे चित्र घोडबंदर सेवारस्ते, वागळे इस्टेट परिसर, कोपरी, उपवन, वर्तकनगर, शास्त्रीनगर, तीनहात नाका-नितीन-कॅडबरी सेवारस्ते, गोखले मार्ग, उथळसर आणि कळवा या भागांत दिसते. गोखले रोड आणि राम मारुती मार्गावर झेब्रा क्रॉसिंग दिसत नाही. वर्तकनगर, शास्त्रीनगर आणि उपवन येथील रस्त्यांवरील गतिरोधकांवर पांढऱ्या पट्टय़ा नाहीत. याशिवाय शहरातील रस्त्यांवर वाहने उभी करण्यासाठी आखण्यात आलेले पिवळे पट्टेही नाहीसे झाले आहेत. तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी या प्रमुख चौकांत झेब्रा क्रॉसिंग ओलांडून वाहने उभी केली जातात.

त्यामुळेही चौकातील वाहतुकीस येऊन कोंडी होते. तीन हात नाका चौकात याच कारणामुळे सतत कोंडी होत असे, मात्र गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलीस झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे वाहनेच येऊ देत नसल्यामुळे येथील कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटली आहे.

असे असले तरी शहरात मात्र सर्वत्र वाहतूक पोलीस तैनात नसल्याने त्या ठिकाणी वाहनचालक वाहतूक नियम पायदळी तुडवतात आणि कोंडीला आमंत्रण देतात.

ठाण्यामध्ये अनेक गतिरोधकांवर पांढरे पट्टे रंगवलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकाला गतिरोधक सहज दिसत नाही. अगदी जवळ आल्यावर गतिरोधक दिसतो, त्यामुळे वाहनचालक ब्रेक दाबतात व अपघात होतात, असे कोपरी येथे राहणाऱ्या किरण सहस्रबुद्ध यांनी सांगितले.

अपघाताची भीती..

शहरात जिथे झेब्रा क्रॉसिंग आहे, तिथेही अनेक वाहनचालक वेग कमी करत नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. कापूरबावडी ते माजिवाडा या मार्गावर झेब्रा क्रॉसिंग रंगवण्यात आले आहे. सिग्नलही आहेत, मात्र तरीही अनेक चालक पादचारी रस्ता ओलांडत असतानाही तेथून वाहने पुढे नेतात. काही चालक तर वाहनांचा वेगही कमी करत नाहीत. शहरात अन्यत्रही असे चित्र दिसते.

ज्या ठिकाणी गतिरोधकांवर आणि झेब्रा क्रॉसिंगवर पांढरे पट्टे रंगवलेले नाहीत त्या ठिकाणांची पाहणी करून पांढरे पट्टे रंगवण्यात येतील.

– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

Story img Loader