लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : आयोध्येतील राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील कौपीनेश्वर या प्राचीन मंदिरात सोमवारी सकाळी शिवसेनेकडून आयोजित महाआरतीदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षातील काही नेत्यांनी चांदीची गदा भेट दिली. ही गदा उचलून घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ती शेजारीच उभे असलेले पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्या खांद्यावर दिली. मुख्यमंत्र्यांच्या या अनपेक्षीत अशा प्रतिक्रियेमुळे अनेकांना आश्चर्य वाटले. मुख्यमंत्र्यांनी ही गदा म्हस्के यांच्याच खांद्यावर का ठेवली याविषयी चर्चाही कार्यक्रमानंतर सुरु झाली.
राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील कोपीनेश्वर या प्राचीन मंदिरात शिवसेनेकडून महाआरतीचे आयोजन सोमवारी सकाळी करण्यात आले होते. आयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठा महासोहळा रामभक्तांना पहाता यावा, यासाठी कोपीनेश्वर मंदिरात मोठा पडदा लावण्यात आला होता. त्यावर आयोध्येतील कार्यक्रमाचे सुरु असलेले थेट प्रेक्षपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पदाधिकारी आणि राम भक्त पहात होते. याचदरम्यान, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना चांदीची गदा भेट दिली. ही गदा उचलून घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ती शेजारीच उभे असलेले पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्या खांद्यावर दिली. मुख्यमंत्र्यांच्या या अनपेक्षीत प्रतिक्रियेनंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या. मुख्यमंत्र्यांच्या लगतच उभे असलेले महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर आणि कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेला हसून दाद देताच उपस्थितांनी ‘जय श्री राम आणि पवनसुत हनुमाना’च्या दिलेल्या घोषणा बरेच काही सांगून जाणाऱ्या ठरल्या.
आणखी वाचा-“कोण पहात असेल, नसेल…बाळासाहेब, दिघेसाहेब हा सोहळा पहात आहेत”… मुख्यमंत्र्यांचे उद्गार
मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा होता?
शिवसेनेतील उठावाच्या सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नरेश म्हस्के यांनी साथ दिली आहे. महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने ठाणे जिल्ह्यातील संघटनेवर पकड मिळविण्याच्या कामात म्हस्के यांची महत्वाची भूमीका ठरल्याचे बोलले जात होते. यामुळे विरोधी पक्षाकडून म्हस्के हे नेहमीच टिकेचा आणि तितक्याच संतापाचा विषय ठरले होते. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांकडून होणाऱ्या आरोपांना प्रतिउत्तर देणे, पक्षांच्या सभांचे नियोजन, राम मंदीर उत्सवानिमित्त ठाणे शहरात आयोजित कार्यक्रमांचे नियोजन करणे, यामध्ये म्हस्के हे महत्वाची भुमीका बजावताना दिसून येत आहेत.
आणखी वाचा-कल्याणमध्ये रामभक्तांच्या समक्ष मूर्तिकारांनी साकारली सहा फूटाची राम मूर्ती
म्हस्के यांची लोकसभेसाठी निवड?
ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यातील ठाणे लोकसभा मतदार संघाच्या जागेसाठी शिवसेना आग्रही आहे. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेला मिळाल्यास उमेदवार कोण याचीही चर्चा शहरात रंगली असून यामध्ये नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्या खांद्यावर चांदीची गदा दिल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला सुरूवात झाली आहे. ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार राजन विचारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याचे बोलले जाते. एकेकाळी आमदार होण्यासाठी कमालिचे उत्सुक असलेले म्हस्के अनेकदा ही संधी हुकल्याने गेल्या काही दिवसांपासून लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यानिमीत्ताने काही राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का अशी चर्चाही आता सुरु झाली आहे.