ठाणे : भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. असे असतानाही त्यांना लोकसभेसाठी उमेदवार मिळत नसल्याने ते इतर पक्षांतील नेते फोडत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. भारत जोडो न्याय यात्रा येत्या १५ व १६ मार्चला ठाणे जिल्ह्यात येत असून त्याची माहिती देण्यासाठी इंडिया आघाडीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी आव्हाड यांनी भाजपवर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पत्रकार परिषदेस शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. असे असतानाही त्यांना लोकसभेसाठी उमेदवार मिळत नाही. त्यामुळे इतर प्रादेशिक पक्षांतील नेते फोडत आहेत. बाहेरून आमच्या पक्षात ऐवढे नेते येत आहेत की, आम्हाला पुन्हा सतरंजी उचलण्याचे आणि फलक लावायची कामे करावी लागणार आहेत, असे भाजपचे आमदार खासगीत सांगत असल्याचेही आव्हाड म्हणाले. भाजपने एक प्रकारे पक्ष निष्ठेला संपविण्याचे काम केले आहे. परंतु निष्ठा कधी संपत नसते, निष्ठेची ताकद फार मोठी, असे देखील त्यांनी सांगितले.

हेही वाचा – सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे भाजपला आव्हान, संघर्ष हाणामारीपर्यंत

पूर्वी निवडणुकीत उमेदवार कुठे उभा राहणार त्याचे तिकीट शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील हे बसून निश्चित करत होते. त्यानंतर अजित पवार हे यादी जाहीर करत होते. आता त्यांना कुठली जागा व कुठले तिकीट मिळेल याची शाश्वती नसल्याची टीका आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली.

हेही वाचा – “संजय राऊत खोटे बोलताहेत,” प्रकाश आंबेडकर यांचे विधान; म्हणाले, “आधी भांडणे मिटवावीत…”

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १५ मार्चला वाडा मार्गे भिवंडीत येणार आहे. त्यानंतर भिवंडीतील एका मैदानात ही यात्रा थांबणार आहे. १६ मार्चला ही यात्रा भिवंडी येथून खारेगाव टोलनाका, मुंब्रा बाह्यवळण येथून मुंब्रा कौसा, मुंब्रा शहर, कळवा येथून ठाणे शहरातील जांभळीनाका येथे येणार आहे. राहुल गांधी हे त्यांच्या वाहनातून यात्रेतील सहभागींना संबोधित करतील. त्यानंतर ही यात्रा मुंबईला रवाना होईल असे विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. राहुल गांधी यांची यात्रा अराजकीय आहे, असा दावा इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does bjp break party jitendra awhad said in thane because ssb