लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : मुंब्रा – कौसा भागात गेल्या अनेक दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. विविध प्राधिकरणांकडून अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याचे कारण पुढे करून ठाणे महापालिकेकडून मुंब्रा, कौसा, खर्डी भागात अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे, असे सांगत राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या भागातील अपुऱ्या पाणी पुरवठ्या मागचे कारण सांगितले आहे.

ठाणे महापालिकेने मुंब्रा, दिवा भागात अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईतुन जी माहिती पुढे येत आहे, त्यावरून आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर भाष्य केले आहे. एका दिवसात एका भागातील ५० अनधिकृत नळजोडण्या, अनधिकृत पाण्याच्या टाक्या शोधल्या जात असतील तर हे मोजमाप करण्यास का टाळाटाळ केली जात आहे, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना विचारला आहे. तसेच अधिकारी वर्गाला हाताशी धरून पाणी माफिया, टँकर माफिया यांनी पैशांसाठी रचलेला हा डाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

अपुरा पाणी पुरवठ्यामागचे कारण ?

मुंब्रा – कौसा भागात गेल्या अनेक दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. विविध प्राधिकरणांकडून अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याचे कारण पुढे करून ठाणे महापालिकेकडून मुंब्रा, कौसा, खर्डी भागात अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. अनेकवेळा सांगूनही होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे मोजमाप करण्यासाठी मीटरही लावण्यात येत नाहीत. या भागात केल्या जाणाऱ्या पाण्याचे मोजमाप करण्यास अधिकारी का तयार होत नाहीत, हा यक्षप्रश्न आहे. आपण सांगूनही अधिकारी या मोजमाप प्रक्रियेला वेळ लागेल, असे अधिकारी सांगत आहेत, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. जर एका दिवसात एका भागातील ५० अनधिकृत नळजोडण्या, अनधिकृत पाण्याच्या टाक्या शोधल्या जात असतील तर हे मोजमाप करण्यास का टाळाटाळ केली जात आहे? अधिकारी वर्गाला हाताशी धरून पाणी माफिया, टँकर माफिया यांनी पैशांसाठी रचलेला हा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

पाण्याचा “काळाबाजार” आणि राजकारण

ही कृत्रिम पाणी टंचाई मी आपल्या निदर्शनास आणून दिली अनेकवेळा बैठकाही घेतल्या. विधानसभेत प्रश्नही विचारले. पण, हे प्रकरण गांभीर्याने घेताना आणि आस्थेने कारवाई करताना पालिका प्रशासन दिसत नाही. त्यामुळेच या परिसरात पाण्याचा “काळाबाजार” आणि राजकारण केले जात आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला आहे. पाणी माफियांवर पाण्याच्या चोरीबाबत गांभीर्याने गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ही मागणी अनेकवेळा करूनही साधा गुन्हा दाखल करण्याचे धारिष्ट्य प्रशासनाकडून दाखविले जात नाही. ज्या गुन्ह्यात अटकच होत नाही. तो गुन्हा नोंदवता तरी कशाला?

या सर्व पाणीचोरीचा प्रश्न निर्माण होत असताना अधिकारी बिन्धास्त आपल्या मर्जीनुसार वागत आहेत. कारण, त्यांना भीतीच राहिलेली नाही. एवढी पाणीचोरी पकडल्यानंतर या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याबाबत कोणतीही स्पष्टता झालेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.